चीनच्या ‘ताईशान’ अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती – ‘चेर्नोबिल डिझास्टर’प्रमाणे स्थिती असल्याचा अमेरिकी माध्यमांचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतातील अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पात भागीदारी असणार्‍या फ्रेंच कंपनीने यासंदर्भातील माहिती अमेरिकेला दिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चिनी यंत्रणांनी सर्व आलबेल असल्याचे निवेदन दिले असून, फ्रेंच कंपनीने तीन ओळींच्या निवेदनात ‘परफॉर्मन्स इश्यू’चा उल्लेख करून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अमेरिकी माध्यमांनी सदर घटनाक्रम 1986 साली चेर्नोबिलमध्ये झालेल्या दुर्घटनेप्रमाणे असल्याचा दावा केला आहे.

किरणोत्सर्गचीनच्या दक्षिण भागातील ग्वांगडाँग प्रांतात ‘ताईशान’ अणुप्रकल्प असून त्यात दोन अणुभट्टया कार्यरत आहेत. हा प्रकल्प चीन व फ्रान्सने संयुक्तरित्या उभारला आहे. फ्रान्सच्या ‘फ्रॅमअ‍ॅटम’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून देखभालीचीही जबाबदारी या कंपनीकडेच आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात ‘ताईशान’ अणुप्रकल्पासंदर्भात अचानक अमेरिकेशी संपर्क साधल्याचे ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सांगण्यात आले. त्यानंतर 3 जूनला सदर कंपनीकडून अमेरिकी यंत्रणांना पाठविण्यात आलेल्या पत्रात अणुप्रकल्पातून ‘फ्युजन गॅस’ची गळती होत असून सुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

त्यानंतर अमेरिकी यंत्रणांनी अणुप्रकल्पाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली होती. 8 जूनला फ्रेंच कंपनीकडून पुन्हा एकदा अमेरिकी कंपनीला ‘मेमो’ पाठविण्यात आला. त्यात प्रकल्पातून किरणोत्सर्ग होण्याची भीती व्यक्त करून सहाय्याची गरज लागू शकते, अशी विनंती करण्यात आली होती. ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त उघड केल्याने खळबळ उडाली आहे. चीनच्या यंत्रणेने रविवारी यासंदर्भात निेवेदन प्रसिद्ध करून सर्व अणुप्रकल्प निकषांनुसार योग्य प्रकारे कार्यरत असल्याचा दावा केला.

किरणोत्सर्गमात्र या मुद्यांवर अमेरिका तसेच फ्रान्समध्ये बैठका झाल्याचे तसेच अमेरिकेने चीनशीही संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. चीनने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला असून चीनच्या माध्यमांनीही या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यापाठोपाठ फ्रेंच कंपनीकडूनही निवेदन जारी करण्यात आल्याने प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याचे मानले जात आहे. अमेरिकी माध्यमांनी याची तुलना रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेशी केली आहे.

26 एप्रिल, 1986 रोजी तत्कालिन सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातील ‘रिअ‍ॅक्टर 4’मध्ये मोठ्या प्रमाणात अणुगळती झाली होती. त्यानंतर झालेल्या स्फोटात प्रकल्पातील 50 जणांचा जागीच बळी गेला होता. प्रकल्पातून झालेल्या घातक किरणोत्सर्गामुळे हजारो लोकांचा बळी गेला होता. अपघातातील भयावह गळतीमुळे हजारो किलोमीटसर्चा परिसर रिकामा करणे भाग पडले होते. चेर्नोबिलची ही दुर्घटना जगातील सर्वात मोठे ‘न्यूक्लिअर डिझास्टर’ म्हणून ओळखण्यात येते.

गेल्याच महिन्यात, तब्बल 35 वर्षानंतर युक्रेनमधील वादग्रस्त चेर्नोबिल अणुप्रकल्पात पुन्हा एकदा ‘न्यूक्लिअर ब्लास्ट’ होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैज्ञानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होेते.

leave a reply