कोरोनाचे संक्रमण वाढण्याच्या भीतीने गुजरात, कर्नाटक सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला

- मुंबई, ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

नवी दिल्ली/मुंबई – अनलॉक-6 अंतर्गत राज्यांना शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आल्यानंतर काही राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यावर या राज्यांकडून निर्णयाची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 9 ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असले तरी मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत तरी सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आणि राज्यात दिल्ली आणि केरळप्रमाणे कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हरियाणामध्ये शाळा सुरू होताच काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाच्या साथीची लागण झाल्याचे समोर आले होते. या नंतर हरियाणा सरकारने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणात 174 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तामिळनाडूतही याआधी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांपर्यंत कोरोना पोहोचला होता. हरियाणा आणि तामिळनाडूतील उदाहरण आणि पुन्हा वाढू लागलेले या साथीचे रुग्ण पाहता आता प्रशासनानेही धडकी घेतली आहे.

कर्नाटकने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. गुजरातमध्येही 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार होत्या. मात्र आता गुजरात सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी थांबवली आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही शाळांना तसे आदेश देण्यात आले आहेत. मिझोराममध्ये 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र दोन शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर ताबडतोब येथील सरकारने विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण वाढू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड सरकारनेही या महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरू केल्या. मात्र पाच दिवसाने त्यांना पुन्हा राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. कारण शाळांमधील 80 शिक्षक कोरोनाबाधित आढळले होते. राज्यस्थाननेही शाळा सुरू करण्याचा निर्णय 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. मध्य प्रदेश सरकारनेही शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने नव्या गाईडलाईन्सनुसार राज्यभरातील 9 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला होता. यासाठी सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. यानुसार 50 टक्के उपस्थिती, एक दिवस आड शाळा आणि मधल्या सुट्टीला न देण्याचे शाळांना बजावण्यात आले होते. तसेच शिक्षकांना पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. शाळेत येणाऱ्या मुलांचे थर्मल स्क्रिनींग आणि शाळेत निर्जंतुकिकरण करण्याचे शाळांना बजावण्यात आले होते.

मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय आता जिल्ह्या प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे. परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा असे राज्य सरकारने म्हटले आहे. यानंतर शुक्रवारी मुंबई आणि ठाणे प्रशासनाने आपल्या अधिकार क्षेत्रातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आल्याने मुंबईतील शाळा पुढील वर्षीच सुरू होणार आहेत.

leave a reply