तुर्कीच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्स भूमध्य सागरी क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका तैनात करणार

पॅरिस/अंकारा – गेल्या वर्षभरात तुर्कीकडून भूमध्य सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना शह देण्यासाठी फ्रान्सने या क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी तैनातीबाबत माहिती दिली. त्याचवेळी भूमध्य सागरी क्षेत्रातील सायप्रस या देशाने संयुक्त अरब अमिरातीबरोबर (युएई) लष्करी सहकार्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. हा करार तुर्कीच्या हालचाली रोखण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात येते. युरोप व आखाती देशांकडून सुरू असलेल्या या हालचालींमुळे तुर्कीवर चांगलाच दबाव आला असून राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी युरोपिय देशांशी सहकार्याची भाषा सुरू केली आहे.

गेल्या वर्षी तुर्कीने भूमध्य सागरी क्षेत्रातील काही भागांमध्ये एकतर्फी इंधन सर्वेक्षण सुरू केले होते. त्यासाठी तुर्कीने संशोधन जहाजांसह युद्धनौका तैनात केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, हे भाग सायप्रस तसेच ग्रीसच्या हद्दीत असल्याने या दोन्ही देशांनी त्यावर आक्षेप घेतले होते. मात्र तुर्कीने हे आक्षेप धुडकावत आपली मोहीम सुरू ठेवली होती. तुर्कीच्या या आडमुठेपणावर युरोपिय महासंघ तसेच नाटोने आक्षेप घेतला होता. ग्रीस व सायप्रस हे दोन्ही युरोपिय महासंघाचे सदस्य देश असल्याने महासंघाने या देशांमागे ठाम उभे राहण्याची भूमिका जाहीर केली होती.

या मुद्यावर फ्रान्सने आक्रमक भूमिका घेऊन तुर्कीच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती. त्याचवेळी ग्रीस व सायप्रसच्या समर्थनार्थ आपल्या विनाशिका भूमध्य सागरी क्षेत्रात तैनातही केल्या होत्या. फ्रान्सने ग्रीस व सायप्रसबरोबर द्विपक्षीय तसेच बहुराष्ट्रीय युद्धसरावातही भाग घेतला होता. त्यानंतर ग्रीसने फ्रान्सबरोबर व्यापक संरक्षण सहकार्य करार करून लढाऊ विमाने तसेच युद्धनौकांच्या खरेदीची घोषणा केली होती. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उघडपणे तुर्कीचे भूमध्य सागरी क्षेत्रातील धोरण शत्रूदेशाप्रमाणे असल्याचे टीकास्त्र सोडले होते.

अशा पार्श्‍वभूमीवर फ्रान्सने आपली विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स द गॉल’ भूमध्य सागरी क्षेत्रात तैनात करण्याची घोषणा करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी या तैनातीची घोषणा करताना आखातातील दहशतवादविरोधी मोहिमेचा संदर्भ दिला आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत ही तैनाती होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात ही तैनाती तुर्कीवर दबाव आणण्याच्या धोरणाचा भाग असू शकते, असे विश्‍लेषकांकडून सांगण्यात येते.

फ्रान्सकडून विमानवाहू युद्धनौका तैनातीचा निर्णय जाहीर होत असतानाच सायप्रसने संयुक्त अरब अमिरात बरोबर(युएई) लष्करी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये संयुक्त युद्धसराव तसेच प्रशिक्षण मोहिमा पार पडणार आहेत. त्याचवेळी भूमध्य सागरी क्षेत्रात लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलली जातील, अशी माहिती सायप्रसने दिली आहे. युएईबरोबरील करारापूर्वी सायप्रसने इस्रायल, इजिप्त व जॉर्डन या देशांबरोबरही लष्करी सहकार्य करार केले आहेत.

तुर्कीने सायप्रसच्या हद्दीतील अनेक क्षेत्रांवर आपला दावा सांगितला असून जबरदस्तीने इंधन उत्खननाच्या योजना जाहीर केल्या आहेत. या मुद्यावरून युरोपिय महासंघाने तुर्कीवर निर्बंधही लादले आहेत. त्यापाठोपाठ आता सायप्रसने युएईबरोबर लष्करी करार केल्याने तुर्कीवरील दबाव अधिकच वाढल्याचे दिसत आहे. सायप्रसने केलेल्या करारापूर्वी ग्रीसनेही युएईबरोबर संरक्षण सहकार्य करार केला होता. ग्रीसने इस्रायल, इजिप्त व सौदी अरेबियाबरोबर सहकार्य वाढविण्यासाठीही पावले उचलली आहेत.

ग्रीस व सायप्रसने इतर देशांबरोबरील सहकार्यसाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेल्या यशामुळे तुर्की चांगलाच कोंडीत सापडल्याचे दिसत आहे. युरोप व आखाती देश तुर्कीच्या विरोधात व्यापक आघाडी उभारत असल्याचे चित्र समोर येत असल्याने तुर्कीने आता युरोपिय देशांबरोबर जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, आपण युरोपिय महासंघाबरोबरील संबंध पूर्वपदावर आणण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य करण्यापूर्वी भूमध्य सागरी क्षेत्रातील वाद सोडविण्यासाठी ग्रीसबरोबर चर्चेस तयार असल्याचेही तुर्कीने जाहीर केले आहे.

leave a reply