फ्रान्स-ग्रीसमधील लष्करी सहकार्य नाटो व युरोपसाठी धोकादायक ठरेल

- तुर्कीचा युरोपिय महासंघ व नाटोला इशारा

इस्तंबूल – फ्रान्स व ग्रीसमध्ये पार पडलेल्या अब्जावधी युरोच्या संरक्षण करारावर तुर्कीने संताप व्यक्त केला. ‘तुर्कीबरोबर सहकार्य करण्याऐवजी संरक्षणसज्जता वाढविण्याचे ग्रीसचे धोरण या देशासाठीच समस्या निर्माण करणारे आहे. यामुळे ग्रीस आणि युरोपिय महासंघाची हानी होईल. त्याचबरोबर या क्षेत्राची शांती व स्थैर्य धोक्यात येईल’, असा इशारा तुर्कीने दिला आहे. त्याचबरोबर फ्रान्स व ग्रीसमधील सदर सहकार्य नाटोची हानी करणारे असल्याची टीकाही तुर्कीने केली आहे. फ्रान्स, ग्रीस व तुर्कीही नाटोचे सदस्यदेश असल्याने त्यांच्यातील वाद नाटोच्या एकजुटीवर परिणाम करणारा ठरू शकतो.

दोन दिवसांपूर्वी फ्रान्स आणि ग्रीसमध्ये अब्जावधी युरोचा संरक्षण करार पार पडला. या करारानुसार फ्रान्स ग्रीसला तीन प्रगत विनाशिका पुरविणार आहे. यामुळे ग्रीसच्या नौदल सामर्थ्यात वाढ होणार असल्याचा दावा दोन्ही देशांच्या नेत्यांनी केला होता. या करारामुळे उभय देशांचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, क्षेत्रीय अखंडता संरक्षित करण्यास सहाय्य मिळेल, असा दावा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी ग्रीसने फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी केली होती.

फ्रान्स व ग्रीसमधील या वाढत्या संरक्षण सहकार्यावर तुर्कीने ताशेरे ओढले. फ्रान्ससोबत संरक्षणसिद्धता वाढवून ग्रीस तुर्कीला एकटे पाडू शकत नसल्याचा दावा तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तान्जू बिलिजीच यांनी केला. या सहकार्याने ग्रीस तसेच युरोपिय महासंघाचीच हानी होईल, अशी धमकी बिलिजीच यांनी दिली. त्याचबरोबर तसेच फ्रान्स व ग्रीसमधील हे सहकार्य तुर्कीविरोधात असल्याचा आरोपही तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला. नाटोचे सदस्यदेशच दुसर्‍या सदस्यदेशाविरोधात सहकार्य करून नाटोला हानी पोहोचवित असल्याचा इशारा बिलिजीच यांनी दिला.

ग्रीसने तुर्कीच्या या इशार्‍यांना महत्त्व दिलेले नाही. गेली काही वर्षे ग्रीस व तुर्कीमध्ये सागरी क्षेत्रावरुन वाद सुरू आहे. एर्दोगन यांच्या राजवटीने गेल्या दोन वर्षांमध्ये ग्रीसच्या सागरी क्षेत्रावर अधिकार सांगितला असून आपल्या विनाशिकाही रवाना केल्या होत्या. तुर्कीच्या या आक्रमकतेविरोधात फ्रान्ससह युरोपिय महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्स व ग्रीसमधील या सहकार्यावर तुर्की अस्वस्थ झाला आहे.

leave a reply