जम्मू-काश्‍मीरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये फ्रान्स गुंतवणुकीसाठी उत्सुक

नवी दिल्ली – फ्रान्सने जम्मू-काश्‍मीरसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पर्यटन आणि इतर क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनाईन यांनी ईशान्य क्षेत्र विकासमंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत इमॅन्युएल यांनी जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्य भारतात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या संधींबद्दल जाणून घेतले. जम्मू-कश्‍मीरमधून कलम-370 हटविल्यावर या केंद्र शासित प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. अशावेळी फ्रान्सने जम्मू-काश्‍मीरमधील गुंतवणुकीची, येथील प्रकल्पांमध्ये सहकार्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्‍मीरला मिळालेला विशेष दर्जा आणि येथील कायद्यांमुळे येथे गुंतवणुकीला मर्यादा होत्या. तसेच दहशतवादाने होरपळणार भाग अशी जम्मू-काश्‍मीरची जगभरात ओळख बनली होती. येथून कलम-370 हटवून जम्मू-काश्‍मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्यावर सरकारने कितीतरी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच या भागातून आता दहशतवाद कमी झाला असून शांतता आणि स्थिरतेकडे जाणाऱ्या जम्मू-कश्‍मीरमधील प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी आता गुंतवणूकदार पुढे येत आहेत. फ्रान्सही या भागात भारताबरोबर सहकार्याच्या संधी तपासत आहे. हे लक्षवेधी ठरत आहे.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनाईनयांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्याबरोबरील चर्चेत आपल्या काश्‍मीर भेटीच्या आठवणीही जागविल्या. जम्मू-कश्‍मीरमधून कलम-370 हटविल्यावर काही दिवसांनी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या गटाने या जम्मू-काश्‍मीरचा दौरा केला होता. यामध्येइमॅन्युएल यांचाही समावेश होता.जितेंद्र सिंग यांच्याबरोबरील चर्चेत जम्मू-कश्‍मीरसह ईशान्य भारतातील प्रकल्पांमध्ये फ्रान्स सहकार्यास उत्सुक असल्याचे इमॅन्युएल म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या भागातील क्षेत्रात उपलब्ध संधींबाबत इमॅन्युएल यांना माहिती दिली. तसेच इस्रायल, जपान सारखे देश येथील पायभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करीत असल्याकडे जितेंद्र सिंग यांनी फ्रान्सच्या राजदूतांचे लक्ष वेधले.

leave a reply