जर्मनीकडून ‘स्पेस कमांड’ची घोषणा

‘स्पेस कमांड’बर्लिन – अंतराळक्षेत्र हा देशातील पायाभूत सुविधांमधील संवेदनशील घटक असून त्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, या शब्दात जर्मनीच्या संरक्षणमंत्री अ‍ॅनग्रेट क्रॅम्प-कॅरेनबॉअर यांनी जर्मनी स्वतंत्र ‘स्पेस कमांड’ची स्थापना करीत असल्याचे जाहीर केले. संरक्षणविभागाअंतर्गत स्वतंत्र स्पेस कमांडची स्थापना करणारा जर्मनी हा युरोपातील तिसरा देश ठरला आहे. गेल्याच महिन्यात नाटोनेही ‘आर्टिकल 5’मध्ये यापुढे अंतराळक्षेत्राचाही समावेश असेल, अशी घोषणा केली होती. ‘आर्टिकल 5’नुसार नाटोच्या सदस्य देशावर झालेला कोणताही हल्ला हा नाटोवरील हल्ला समजून नाटोचे इतर सदस्य देश त्याला प्रत्युत्तर देतील, अशी तरतूद नाटोने केली आहे.

जर्मनीच्या युडेम शहरातील ‘सेंटर फॉर एअर ऑपरेशन्स’ हे ‘स्पेस कमांड’चे मुख्यालय म्हणूनन कार्यरत राहणार आहे. अंतराळक्षेत्रातील धोके सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे त्याच्या सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे या शब्दात जर्मनीच्या संरक्षण विभागाने नव्या ‘स्पेस कमांड’चे समर्थन केले आहे. ‘जर्मनीची समृद्धी व सुरक्षा अंतराळक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. नागरी तसेच लष्कराचे उपग्रह जर्मनीच्या अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचे स्रोत आहेत. स्रोत संवेदनशील असल्याने त्यांची सुरक्षाही निर्णायक मुद्दा ठरतो’, असे सांगून जर्मनीच्या संरक्षणमंत्री अ‍ॅनग्रेट क्रॅम्प-कॅरेनबॉअर यांनी स्पेस कमांडच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला.

‘स्पेस कमांड’जर्मनीची ‘स्पेस कमांड’ अवकाशातील उपग्रहांची टेहळणी, सुरक्षा तसेच अंतराळातील कचर्‍यावर नजर ठेवणे यासारख्या गोष्टींकडे लक्ष देईल, असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सध्या जर्मनीचे 30हून अधिक उपग्रह अंतराळात कार्यरत आहेत. त्यातील 10हून अधिक उपग्रह दूरसंचार विभागाचा भाग असून पाचहून अधिक लष्करी उपग्रह आहेत. युरोपातील सर्वाधिक उपग्रह असणार्‍या देशांच्या यादीत जर्मनी तिसर्‍या क्रमांकावर आहे.

‘स्पेस कमांड’गेल्या काही वर्षात अंतराळक्षेातील संघर्षाचा धोका वाढला असून रशिया व चीनसारखे देश अंतराळयुद्धाची तयारी करीत असल्याचे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. या दोन्ही देशांनी अंतराळातील उपग्रह भेदता येतील, अशी क्षेपणास्त्रे तसेच प्रगत तंत्रज्ञान विकसित केले असून त्याच्या यशस्वी चाचण्याही घेतल्याचे समोर आले आहे. रशिया व चीनचा हा वाढता धोका रोखण्यासाठी अमेरिकेसह पाश्‍चात्य देश पुढे सरसावले आहेत. अमेरिकेने गेल्या वर्षीच स्वतंत्र ‘स्पेस फोर्स’ उभारल्याची घोषणा केली होती.

2019 साली नाटोने अंतराळक्षेत्र हे पाचवे ‘युद्धक्षेत्र’(डोमेन) असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर युरोपात फ्रान्सने पहिल्यांदा स्पेस कमांडची स्थापना केली होती. तर यावर्षी एप्रिल महिन्यात ब्रिटनने स्पेस कमांडची उभारणी केल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आता जर्मनी हा स्पेस कमांडची स्थापना करणारा युरोपातील तिसरा देश ठरला आहे.

leave a reply