बेलारुसमधून येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी जर्मनी पोलंडला सहकार्य करणार

पोलंडला सहकार्य

बर्लिन/वॉर्सा/मिन्स्क – बेलारुसमधून युरोपिय महासंघात येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी जर्मनीने पोलंडला सहकार्य करण्याचे संकेत दिले. जर्मनी व पोलंडच्या सीमेवर संयुक्त गस्त, पोलंडच्या सीमेसाठी अतिरिक्त जवान तसेच निर्वासितांना सुविधा पुरविण्यासाठी अर्थसहाय्य अशा तरतुदी असलेला प्रस्ताव जर्मनीकडून देण्यात आला आहे. बेलारुसमधून पोलंडमध्ये घुसणारे निर्वासित आता जर्मनीतही दाखल होत असल्याचे गेल्या दोन महिन्यात समोर आले आहे. त्यामुळेच जर्मनीने सहकार्याचा प्रस्ताव दिल्याचे मानले जाते.

युरोपिय महासंघाने बेलारुसचे सर्वेसर्वा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासह सरकारवर कडक निर्बंध लादले आहेत. लुकाशेन्को यांना विरोध करणार्‍या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. महासंघाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बेलारुसने निर्वासितांचा वापर सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यात बेलारुसमधून आठ हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा पोलंडने केला आहे.

पोलंडला सहकार्यअवैध निर्वासितांना रोखण्यासाठी पोलंडने यापूर्वीच सीमाभागात कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून लष्करी तुकडीही तैनात केली आहे. गेल्या महिन्यात पोलंड सरकारने पॉडलास्की व लुबेल्स्की या प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली होती. या उपाययोजनांनंतरही निर्वासितांची घुसखोरी पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाहीच, उलट पोलंडमध्ये दाखल झालेले निर्वासित आता जर्मनीसारख्या देशात दाखल होत असल्याचे समोर येत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात बेलारुसमार्गे आलेल्या सुमारे ४,५०० निर्वासितांनी जर्मनीत घुसखोरी केल्याची माहिती जर्मन यंत्रणांकडून देण्यात आली.

पोलंडला सहकार्यही संख्या वाढत असल्याने आता जर्मनीने लोंढे रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जर्मनीच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने पोलंडला सहाय्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात जर्मन-पोलंड सीमाभागात संयुक्त गस्त घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी पोलंडच्या बेलारुसबरोबरील सीमेवर जवानांची तुकडी पाठविण्याचेही संकेत दिले आहेत. बेलारुसमधून पोलंडमध्ये घुसणार्‍या निर्वासितांसाठी सुविधा उभारण्यास जर्मनी मदत करेल, असेही जर्मनीच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने प्रस्तावात नमूद केले आहे.

बेलारुस रशियाच्या सहाय्याने निर्वासितांना युरोपिय सीमेत घुसवित असून हा ‘हायब्रिड वॉरफेअर’चा भाग आहे, असा आरोप पोलंड व लिथुआनियाने केला होता. या आरोपांची महासंघाने गंभीर दखल घेतली असून संबंधित देशांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी निर्वासितांच्या मुद्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

leave a reply