नॅव्हॅल्नी विषप्रयोग प्रकरणावरून जर्मनीचा रशियाला इशारा

- 'नॉर्ड स्ट्रीम२' प्रकल्पावर फेरविचाराचे संकेत

बर्लिन/मॉस्को – अलेक्सी नॅव्हॅल्नी विषप्रयोग प्रकरणात रशिया योग्य सहकार्य न करता जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असेल, तर जर्मनीला ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधन प्रकल्पावर फेरविचार करणे भाग पडेल, असा खरमरीत इशारा जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या प्रवक्त्यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला असून, नॅव्हॅल्नी प्रकरणात कोणत्याही पर्यायाची शक्यता नाकारता येणार नाही, असे बजावले आहे. ब्रिटनने या मुद्द्यावर रशियन राजदूतांना समन्स बजावले असून, युरोपीय महासंघाने रशियावर नवे निर्बंध लादण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याचवेळी बेलारूसचे हुकूमशहा अलेक्झांडर लुकशेन्को यांनी नॅव्हॅल्नी मुद्द्यावर वक्तव्य केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढल्याचे दिसत आहे.

नॅव्हॅल्नी विषप्रयोग प्रकरणावरून जर्मनीचा रशियाला इशारा - 'नॉर्ड स्ट्रीम२' प्रकल्पावर फेरविचाराचे संकेतरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक व ‘रशिया ऑफ द फ्युचर’ या पार्टीचे नेते म्हणून अलेक्सी नॅव्हॅल्नी ओळखण्यात येतात. गेल्या दशकभरात नॅव्हॅल्नी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने केली असून त्याला रशियातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात येते. २०१८ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी पुतीन यांच्याविरोधात उभे राहण्याचा प्रयत्नही केला होता. गेल्या महिन्यात सैबेरियातून मॉस्कोला जात असताना हवाईप्रवासादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २२ ऑगस्टला त्यांना तातडीने जर्मनीत हलविण्यात आले.

जर्मनीत केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून अलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर ‘नोव्हिचोक नर्व्ह एजंट’च्या सहाय्याने विषप्रयोग करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर जर्मनीसह युरोपीय देश आक्रमक झाले असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेऊन सर्व माहिती जाहीर करावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. मात्र रशियाने आपल्यावर झालेले सर्व आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले असून, जर्मनीने त्यांच्याकडील माहिती रशियाला द्यावी, असे प्रत्युत्तर दिले आहे. पुतिन यांना विरोध करणार्‍या रशियन व्यक्तीवर संशयास्पदरित्या विषप्रयोग होण्याची गेल्या तीन वर्षातील ही दुसरी घटना आहे.

नॅव्हॅल्नी विषप्रयोग प्रकरणावरून जर्मनीचा रशियाला इशारा - 'नॉर्ड स्ट्रीम२' प्रकल्पावर फेरविचाराचे संकेतमार्च २०१८ मध्ये रशियाचे माजी लष्करी अधिकारी व गुप्तहेर सर्जेई स्क्रिपल यांच्यासह, त्यांची मुलगी युलियावर ब्रिटनमध्ये ‘नोव्हिचोक नर्व्ह एजंट’च्या सहाय्याने विषप्रयोग करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर युरोपीय देशांसह अमेरिकेने रशियावर निर्बंध लादून राजनैतिक सहकार्य कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हे निर्बंध कायम असतानाच कट्टर पुतीन विरोधक अशी ओळख असणाऱ्या नॅव्हॅल्नी यांच्यावर विषप्रयोग होणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. या मुद्द्यावरून ब्रिटन व जर्मनीसह सर्व युरोपीय देश रशियाविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

नॅव्हॅल्नी विषप्रयोग प्रकरणावरून जर्मनीचा रशियाला इशारा - 'नॉर्ड स्ट्रीम२' प्रकल्पावर फेरविचाराचे संकेतयुरोपीय महासंघाने या मुद्द्यावर रशियाविरोधात नवे निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली आहे. ‘नाटो’नेही याप्रकरणी रशियाकडून खुलासा मागितला आहे. जर्मनीने याप्रकरणी वारंवार रशियाचे संपर्क साधूनही अद्याप योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जर्मनीच्या राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी असून जर्मन चॅन्सलर मर्केल यांच्यावर आक्रमक भूमिका घेण्यासाठी दडपण आणण्यास सुरुवात झाली आहे. परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम२’वरून दिलेला इशारा त्याचाच भाग मानला जातो. ‘नॉर्ड स्ट्रीम२’ हा रशिया व जर्मनीमधील महत्त्वाकांक्षी इंधनप्रकल्प असून त्यात दोन्ही बाजूंनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. अमेरिका व काही युरोपीय देशांच्या विरोधानंतरही जर्मनीने हा प्रकल्प पुढे रेटला असून सध्या तो अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जाते.

अशा स्थितीत, जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी त्याचा फेरविचार करण्याचा इशारा देणे खळबळ उडविणारे ठरते. प्रकल्प स्थगित झाल्यास दोन्ही बाजूंना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. चॅन्सलर मर्केल व जर्मन उद्योजकांच्या गटाने याकडे लक्ष वेधून सध्याच्या स्थितीत असा निर्णय योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे. मात्र परराष्ट्रमंत्री मास यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जर्मनीतील काही राजकीय नेत्यांनी त्याचे समर्थन केले असून ही गोष्ट मर्केल यांना अडचणीत आणणारी ठरू शकते.

leave a reply