वाढती महागाई व डॉलरमधील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर सोन्याचे दर औंसामागे तीन हजार डॉलर्सपर्यंत उसळतील

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावा

महागाईवॉशिंग्टन/लंडन – वाढती महागाई व अमेरिकी चलन डॉलरच्या मूल्यात होणारी घसरण या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेतील कल कायम राहिला तर येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर तब्बल तीन हजार डॉलर्स प्रति औंस अशी उसळी घेऊ शकतात, असे भाकित विश्‍लेषकांनी वर्तविले आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी दीड टक्क्यांहून अधिक उसळी घेत १,८१२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) अशी झेप घेतली होती.

गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन, कोळसा तसेच ऍल्युमिनिअमच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी कोरोनाच्या साथीत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा साखळीत (सप्लाय चेन) मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये उत्पादनांच्या किंमतीत वाढ होत असून प्रचंड महागाई भडकली आहे. या सगळ्यांचे पडसाद सोन्याच्या बाजारपेठेवरही उमटण्यास सुरुवात झाली असून दरांमध्ये हळुहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

या आठवड्यात, सोन्याच्या दरांमध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यासाठी झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दर १,८१२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) असे नोंदविण्यात आले. ‘वाढती महागाई व डॉलरच्या मूल्यातील घसरणीची भीती यामुळे सोन्याच्या दरांमध्ये वाढ होत आहे’, अशी माहिती विश्‍लेषक जिम वायकॉफ यांनी दिली. इतर विश्‍लेषकांनीही महागाईच्या मुद्याकडे लक्ष वेधले असून सोन्याची मागणी वाढण्यामागे हे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे नमूद केले.

कॅनडातील ‘गोल्ड रॉयल्टी कॉर्प.’चे प्रमुख डेव्हिड गॅरोफॅलो यांनी वाढत्या महागाईला तोंड देण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून सोन्याचे दर तब्बल तीन हजार डॉलर्सपर्यंत उसळी घेऊ शकतात, असे भाकित वर्तविले आहे. यासाठी वर्षे नाही तर फक्त काही महिन्यांचा कालावधी लागेल, असा दावाही त्यांनी केला. त्यांचे सहकारी रॉब मॅक्एवन यांनी दीर्घकालिन मागणीत हे दर पाच हजार डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतधोरण, कोरोनामुळे वाढलेला कर्जाचा बोजा व सप्लाय चेनमधील अडचणी यासारख्या गोष्टींमुळे नागरिक पारंपारिक मार्गांकडे वळत असल्याकडे मॅक्एवन यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी फक्त अमेरिकी डॉलरच नाही तर जगातील इतर प्रमुख चलनांचे मूल्यही घसरत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या महागाईच्या वातावरणात क्रिप्टोकरन्सीपेक्षा सोनेच चांगली सुरक्षा पुरवू शकते, असा दावाही मॅक्एवन यांनी केला आहे.

leave a reply