महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय

- ७० टक्के पालक शाळा सुरू करण्याच्या मताचे असल्याचा शिक्षणमंत्र्यांचा दावा

शाळा सुरू करण्याचा निर्णयमुंबई – कोरोनाच्या महासाथीमुळे गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली असून येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होतील. ग्रामीण भागात ५वी ते १२वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तर इतर वर्ग सध्या आहेत, त्याप्रमाणे ऑनलाईन सुरू राहतील. तसेच मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये शाळा तुर्तास बंद राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७० टक्के पालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याला पाठिंबा दिला असल्याचे, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होतील. कृतीदल आणि राज्य सरकारने मिळून शाळा सुरू करताना एका नियमावली तयार केली असून ही नियमावली सर्व शाळा, पालक व विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. जुलै महिन्यातच कोरोनाची साथीचे रुग्ण आढळत नसलेल्या ग्रामीण भागात ८ पासून पुढील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. आता राज्यात सर्वत्र शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र अंतिम निर्णय झाला नव्हता. पण मंत्रिमंडळातील चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताववर अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली आहे.

नियमावलीनुसार प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या, तसेच विद्यार्थ्यांचे टेम्परेचर दररोज तपासण्यास सांगण्यात आले आहे. शाळेमध्ये सॅनेटायझर उपलब्ध असावे. तसेच मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहीत करावे. स्कूलबसमध्ये येणार्‍या मुलांसाठी एका आसनावर एकच विद्यार्थी असावा. शिक्षकांनी दोन्ही डोस घेतलेले असावे, विद्यार्थ्यांना गृहपाठ ऑनलाईन सादर करण्यास सांगावा, शक्यतो गृहपाठ शाळेतच पुर्ण करून घ्यावा, असे नियमावलीत म्हटले आहेत. तसेच शाळा सुरू झाल्या तरी खेळाच्या तासात कोणत्याही प्रकारचे खेळ घेऊ नयेत. कोरोना परिस्थिती आणखी सामान्य झाल्यावर खेळ घेण्यास हरकत नसल्याचेही या नियमावलीत म्हटले आहे.

शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत हजेरीसाठी कोणतीही सक्ती नसेल. शाळेतही ठराविक अंतराने विद्यार्थ्यांना बसवावे लागेल. शक्य असल्यास एक दिवस शाळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याच्या शिक्षणमंत्री म्हणाल्या.

leave a reply