हैतीच्या प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या दोन हजारांवर

- १२ हजारांहून अधिक जखमी, शेकडो अद्यापही बेपत्ता

पोर्ट ओ प्रिन्स – गेल्या आठवड्यात ‘कॅरिबिअन आयलंड’ क्षेत्रातील हैतीत आलेल्या प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या दोन हजारांवर गेली आहे. भूकंपापाठोपाठ हैतीला ‘ग्रेस’ नावाच्या वादळाने झोडपले असून मदत व बचावकार्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकापाठोपाठ आलेल्या या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्‍वभूमीवर देशात कोरोनाची साथ तीव्र होण्याची भीती वर्तविण्यात आली असून कॉलरा व डायरियासारख्या रोगांच्या साथीही सुरू होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या नागरिकांपैकी जवळपास ४० टक्के जणांना मानवतावादी सहाय्याची आवश्यकता भासेल, असे संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून सांगण्यात आले आहे.

हैतीच्या प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या दोन हजारांवर - १२ हजारांहून अधिक जखमी, शेकडो अद्यापही बेपत्ताशनिवारी १४ ऑगस्टला हैतीतील लेस केयेस भागाला ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. गेल्या १२ वर्षात हैतीत आलेला हा दुसरा प्रलयंकारी भूकंप ठरला. नव्या भूकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत २ हजार, १८९ जणांचा बळी गेला असून १२ हजारांहून अधिक जण जखमी आहेत. भूकंपानंतर बेपत्ता झालेल्यांची संख्या ३००वर असल्याचे सांगण्यात येते. मात्र अमेरिकी यंत्रणांनी ही संख्या जास्त असू शकते, असा दावा केला आहे. ‘युएस जिऑलॉजिकल सर्व्हे’च्या अंदाजानुसार भूकंपाची तीव्रता लक्षात घेता बळींची संख्या १० हजारांच्या घरात जाऊ शकते. १४ तारखेच्या भूकंपानंतर हैतीला जवळपास ६०० ‘आफ्टरशॉक्स’ बसल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे.

हैतीच्या ‘नॅशनल सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी’ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपग्रस्त भागातील जवळपास ५३ हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ३० हजारांहून अधिक कुटुंबे बेघर झाली असून, अजूनही काहींच्या निवार्‍याची सोय झालेली नाही. भूकंपात काही हॉस्पिटल्सही जमिनदोस्त झाल्याने जखमींना एअरलिफ्ट करून राजधानी पोर्ट ओ प्रिन्ससह इतर शहरांमध्ये घेऊन जाणे भाग पडले आहे. अमेरिकी लष्कराकडून लेस केयेसमध्ये फिल्ड हॉस्पिटलची उभारणी सुरू असून ब्रिटीश नौदलाने सहाय्यासाठी जहाज पाठविल्याची माहिती देण्यात आली आहे.

हैतीच्या प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या दोन हजारांवर - १२ हजारांहून अधिक जखमी, शेकडो अद्यापही बेपत्ताभूकंपानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये हैतीला ग्रेस वादळाचा फटका बसला असून त्याने अधिकच पडझड झाल्याचे समोर येत आहे. काही भागांमध्ये दरडी कोसळल्या असून अतिवृष्टीमुळे पाणी साचले आहे. त्यामुळे भूकंपग्रस्त भागापर्यंत मदत पोहोचविण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येते. राजकीय अस्थैर्य व कोरोनासंदर्भातील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय सहाय्य पोचण्यास उशिर झाला असून स्थानिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. आतापर्यंत दाखल झालेले सहाय्य अपुरे असल्यामुळे ते मिळविण्यासाठी चकमकी व संघर्ष होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्याचवेळी हैतीतील गुन्हेगारी टोळ्यांनी सहाय्य घेऊन येणार्‍या संस्थांवर हल्ले चढवून लुटालूट केल्याचेही उघड होत आहे. त्यामुळे सहाय्यासाठी दाखल झालेले गट व स्वयंसेवकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूकंप, वादळ व अपुरे सहाय्य या पार्श्‍वभूमीवर हैतीवर साथीच्या आजारांचे नवे संकट कोसळू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. २०१० साली आलेल्या भूकंपानंतर देशात कॉलराची भयावह साथ आली होती, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी सध्या कोरोनाची साथ सुरू असून आपत्तींच्या नंतर त्याची तीव्रता वाढू शकते, असेही बजावण्यात आले आहे. त्याचवेळी कॉलरा, डायरिया व श्‍वसनाच्या आजारांची साथ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हैतीत २०१० साली झालेल्या भूकंपानंतर प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्ष जोवेनल मॉईस यांच्या हत्येने अधिकच भर पडली आहे. देशात सध्या आणीबाणीची स्थिती लागू असली तरी आपत्ती, त्यानंतर येणार्‍या साथी व त्याच्या जोडीला असलेले राजकीय अस्थैर्य यामुळे हैतीत अराजकाला अधिक बळ मिळू शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply