इराणचे आदेश मिळताच हिजबुल्लाह युरोपात दहशतवादी हल्ला घडविल

- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

वॉशिंग्टन – गेल्या महिन्यात बैरूतच्या बंदरातील अमोनियम नायट्रेटचा साठा भीषण स्फोटासाठी जबाबदार ठरला होता. हा साठा हिजबुल्लाहनेच करून ठेवला होता. युरोपिय देशांमध्येही हिजबुल्लाहने अमोनियम नायट्रेटचा असाच साठा दडवून ठेवला आहे. इराणकडून आदेश मिळताच हिजबुल्लाह या स्फोटकांच्या सहाय्याने युरोपमध्ये हल्ला चढविल, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. त्याचबरोबर युरोपिय देशांनी हिजबुल्लाहचा धोका ओळखून या दहशतवादी संघटनेवर बंदी टाकावी, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले.

इराणचे आदेश मिळताच हिजबुल्लाह युरोपात दहशतवादी हल्ला घडविल - अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशाराअमेरिकेच्या कोषागार विभागाने गुरुवारी लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचा अधिकारी आणि दोन संलग्न कंपन्यांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दहशतवादविरोधी पथकाचे मंत्री नॅथन सेल्स यांनी युरोप व इतर देशांना हिजबुल्लाहपासून सावध रहाण्याचे आवाहन केले. बेल्जियमपासून फ्रान्स, इटली, ग्रीस, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये हिजबुल्लाहने अमोनियम नायट्रेटचा फार मोठा साठा केल्याचा दावा सेल्स यांनी केला. २०१२ सालापासून ते आजपर्यंत हिजबुल्लाहचे दहशतवादी युरोपिय देशांमध्ये अमोनियम नायट्रेटचा साठा करीत असून प्रथमोपचाराच्या डब्ब्यातून याची तस्करी केली जात असल्याचे सेल्स यांनी म्हटले आहे.

या अमोनियम नायट्रेटच्या सहाय्याने युरोपमध्ये दहशतवादी स्फोट घडविण्याची हिजबुल्लाहची योजना असून यासाठी ते इराणच्या आदेशांची वाट पहात आहेत. इराणच्या नेतृत्त्वाने इशारा करताच युरोपमध्ये कुठेही हल्ला चढविण्याची तयारी हिजबुल्लाहने केल्याचे सेल्स यांनी स्पष्ट केले. हिजबुल्लाहला रोखायचे असेल तर ब्रिटन आणि जर्मनीप्रमाणे इतर युरोपिय देशांनी या संघटनेला दहशतवादी घोषित करावे, असे आवाहन सेल्स यांनी केले. गेल्या महिन्यात लेबेनॉनच्या बैरूतमध्ये झालेल्या स्फोटानंतर इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने देखील हिजबुल्लाहने युरोपमध्ये तस्करी करुन लपवून ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटबाबत इशारा दिला होता. तर इस्रायली गुप्तचर संघटना मोसादने ब्रिटन व जर्मनीमधील हिजबुल्लाहचे दहशतवादी व अमोनियम नायट्रेटचा साठा पकडून दिला होता.

दरम्यान, इस्रायलविरोधात तिसरे लेबेनॉन युद्ध छेडण्यासाठी हिजबुल्लाहने बैरुतमध्ये हा साठा जमा केला होता, असे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले होते. इस्रायलने इराणवर हल्ला चढविल्यास अमोनियम नायट्रेटचा वापर करुन इस्रायलवर हल्ले चढविण्याची तयारी हिजबुल्लाहने केली होती. युरोपमध्ये स्फोटके जमा करुन इराणने या हल्ल्याची तीव्रता वाढविण्याची तयारी केल्याचा दावाही याआधी इस्रायली वृत्तवाहिनीने केला होता.

leave a reply