हिजबुल्लाह इस्रायलवर दरदिवशी दोन हजार रॉकेटचे हल्ले चढवू शकेल

- इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा दावा

जेरूसलेम – ‘मे महिन्यात गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर प्रतिदिन चारशेहून अधिक रॉकेट्सच्या सरासरीने ४,४०० रॉकेट हल्ले चढविले होते. पण येत्या काळात लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेबरोबर संघर्ष पेटला तर प्रत्येक दिवशी इस्रायलवर किमान दोन हजार रॉकेट्सचा वर्षाव होईल’, असा इशारा इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिला. ही शक्यता लक्षात घेऊन इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांनी सज्जता ठेवावी, अशी सूचना या इस्रायली अधिकार्‍यांनी दिली.

इस्रायलच्या होम फ्रंट कमांडचे प्रमुख उरी गॉर्डिन यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, हिजबुल्लाहबरोबरच्या युद्धाची शक्यता वर्तविली. ‘इस्रायलला हिजबुल्लाहशी संघर्ष करायचा नाही. पण येत्या काळात हिजबुल्लाहबरोबर संघर्ष भडकलाच तर इस्रायलवर प्रतिदिन १,५०० ते २,५०० रॉकेट्सचे हल्ले होऊ शकतात’, असा इशारा गॉर्डिन यांनी दिला. हमासने मे महिन्यात इस्रायलवर चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांच्या पाचपट रॉकेट हल्ले प्रत्येक दिवशी होतील, अशी शक्यता गार्डिन यांनी वर्तविली.

२००६ साली इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये ३४ दिवसांचा संघर्ष पेटला होता. या संघर्षात हिजबुल्लाहने इस्रायलच्या हद्दीत लघू पल्ल्याच्या किमान चार हजार कत्यूशा रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. या रॉकेट्सचे हल्ले भेदण्यात इस्रायली यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे तत्कालिन ओल्मर्ट सरकारवर जोरदार टीका झाली होती. या संघर्षात इस्रायलच्या लष्कराला १६० जवान गमवावे लागले होते.

पुढच्या काळात इस्रायलने आयर्न डोम ही यंत्रणा विकसित करून लघू पल्ल्याचे रॉकेट हल्ले भेदण्यात मोठे यश मिळविले. पण या काळात हिजबुल्लाहने देखील आपल्या रॉकेट्स व क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत वाढ केल्याचा दावा केला जातो. सध्या हिजबुल्लाहच्या ताफ्यात ४५ हजार ते दीड लाख रॉकेट्सचा साठा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे.

हिजबुल्लाहकडे एक लाखाची फौज – हसन नसरल्लाचा इशारा 

बैरूत – लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाहकडे एक लाख दहशतवाद्यांची फौज आहे. या संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने ही घोषणा केली.

लेबेनॉनमधील आपल्या राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी नसरल्लाने ही माहिती जाहीर केल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. पण हिजबुल्लाहचे संख्याबळ लेबेनीज लष्कराइतकेच असल्याचे यामुळे उघड झाल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

हिजबुल्लाहच्या संख्याबळात झालेली ही वाढ आश्‍चर्यकारक ठरते. त्यामुळे नसरल्लाची घोषणा इस्रायल तसेच पाश्‍चिमात्य देशांसाठी इशारा असल्याचे इस्रायली विश्‍लेषक बजावत आहेत.

 

leave a reply