राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानात अमेरिकेच्या ऐतिहासिक पराभवाची नोंद झाली

- माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जळजळीत टीका

वॉशिंग्टन – ‘राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानात अमेरिकेचा सर्वात दारूण पराभव झाल्याची नोंद इतिहासाने केलेली आहे’, अशा जहाल शब्दात अमेरिकेेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला. अमेरिकेचे विरोधी पक्षनेते, माध्यमे आणि विविध संस्था अफगाणिस्तानातील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करून यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर सडकून टीका करीत आहे. मात्र चहुबाजूंनी होत असलेल्या या टीकेला उत्तर देण्याच्या ऐवजी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी सुट्टीवर गेल्या. तर राष्ट्राध्यक्ष बायडेन देखील ‘कॅम्प डेव्हिड’मध्ये सुट्टी व्यतित करीत असल्याचे सांगितले जाते. सोमवारच्या रात्री राष्ट्राध्यक्ष बायडेन अफगाणिस्तानातील परिस्थितीवर अमेरिकन जनतेला संबोधित करणार असल्याचे वृत्त आले होते.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानात अमेरिकेच्या ऐतिहासिक पराभवाची नोंद झाली - माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जळजळीत टीकाकाही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील परिस्थिती हातळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या बायडेन यांच्यावर ट्रम्प यांनी हल्ला चढविला होता. त्यांच्या अपयशाचा दाखला देऊन ‘तुम्हाला माझी आठवण येते का?’ असा प्रश्‍न ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेला केला. रविवारी व सोमवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील भयंकर परिस्थिती समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी अगदी नेमक्या शब्दात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे अपयश अधोरेखित केले. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दारूण पराभव असल्याची जळजळीत टीका ट्रम्प यांनी केलेली आहे. तर अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी बायडेन यांच्या कमकुवतपणामुळेच अफगाणिस्तानात हे सारे घडत असल्याचा ठपका ठेवला.

‘ट्रम्प यांचासारखा कणखर राष्ट्राध्यक्ष आणि मी परराष्ट्रमंत्री असतो, तर तालिबानने अफगाणिस्तानात हे धाडस केलेच नसते. कारण याची फार मोठी किंमत चुकती करावी लागेल, याची जाणीव तालिबानला ठेवावी लागली असती. इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमान यांना शिकविला तसा धडा मी तालिबानला शिकविला असता’, असे माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी सैन्यमाघार घेण्याचा निर्णय नाही, तर सैन्यमाघार कशारितीने घेता, यावर सारे काही अवलंबून होते, असा टोला लगावला.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानात अमेरिकेच्या ऐतिहासिक पराभवाची नोंद झाली - माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जळजळीत टीकाबायडेन यांचे प्रशासन अफगाणिस्तानातील आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करा म्हणून तालिबानसमोर याचना करीत आहेत. अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी बलिदान दिले, त्याचा शेवट असा होईल, अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती’, अशा शब्दात निक्की हॅले यांनी बायडेन प्रशासनावर प्रहार केले आहेत. तर अमेरिकेचे सिनेटर माईक वॉल्ट्झ यांनी ‘तालिबान अफगाणिस्तानला पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनविल. तालिबानपुरस्कृत दहशतवाद पुढच्या काळात अमेरिकेत घातपात माजविल’, अशी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

केवळ विरोधी पक्षाचे नेतेच नाही, तर माध्यमांनी तसेच काही संस्थांनी देखील बायडेन यांनी अफगाणिस्तानबाबत दाखविलेल्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी उपलब्धच नव्हत्या. त्या आठवडाभरासाठी सुट्टीवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी माध्यमे व जनतेच्या प्रश्‍नांचा मारा चुकविण्याचा प्रयत्न बायडेन प्रशासन करीत असल्याचे दिसते. राष्ट्राध्यक्ष बायडेन देखील ‘कॅम्प डेव्हिड’ येथे सुट्टी घालवत आहेत. अफगाणिस्तानात इतकी भयंकर परिस्थिती उद्भवलेली असताना, त्यांची ही सुट्टी अमेरिकेच्या राष्ट्रीय टीकेचा विषय बनलेला आहे.

मात्र तालिबानने आकस्मिकरित्या घेतलेल्या या आघाडीने बायडेन प्रशासन चकीत झाले, अशा बातम्या येत आहेत. तालिबान इतक्या वेगाने राजधानी काबुलपर्यंत धडक मारील, असे बायडेन प्रशासनाला वाटले नव्हते, असे दावे काही वृत्तसंस्थांनी केले. मात्र अमेरिकेसारख्या देशाला तालिबानच्या हालचालींची खबर नसावी, ही अशक्य कोटीतली बाब ठरते, असे सांगून जगभरातील निरिक्षक हा दावा फेटाळत आहेत. तालिबानची आगेकूच अमेरिकेला अपेक्षितच होती. बायडेन प्रशासन आणि तालिबानमध्ये यासंदर्भात आधीच डील झाली असावी, अशी दाट शक्यता हे आंतरराष्ट्रीय निरिक्षक व्यक्त करीत आहेत.

leave a reply