हिजबुल मुजाहिद्दीनची जम्मू काश्मीरच्या नेत्यांना धमकी

जम्मू – ‘राजकारणापासून दूर रहा, नाहीतर त्याचे भयंकर परिणाम होतील. तुमच्या मृत्यूचे वॉरंट निघेल’, अशी धमकी पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ने जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना दिली आहे. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात पत्र पाठवून हिजबुलने ही धमकी दिली असून केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनाही लक्ष्य करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

हे पत्र पोस्टाने पाठ्वण्यात आल्याचे जम्मूच्या पीर मिठा पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अनयत अली यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील पंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांच्या डोळ्यात ऍसिड टाकण्याची धमकी हिजबुल मुजाहिद्दीनने या पूर्वी २०१८ मध्ये दिली होती. दोन महिन्यापूर्वी दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील लाकरीपुरामधील लूकबवान गावचे सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर आणखी एका महिला सरपंचाला दहशतवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. तसेच एका सरपंचाच्या अपहरणाची घटना घडली होती.

आता ‘हिजबुल’कडून एक पत्र पाठवून लोकप्रतिनिधींना धमकावण्यात येत आहे. उर्दूमध्ये लिहिलेल्या पत्रात १७ नेत्यांची नावे नमूद करण्यात आली असून नेत्यांनी राजकारणापासून दूर राहण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण सोडून द्या आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन द्या अन्यथा तुमच्याविरूद्ध मृत्यू वॉरंट काढण्यात आले आहे. कोणतेही सुरक्षा कवच तुमचे रक्षण करू शकणार नाही, अशी धमकी पत्रात आहे.

मात्र, दहशतवाद्यांच्या धमकीला आम्ही किंमत देत नाही, अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली आहे. सध्या दहशतवाद्यांची अवस्था खराब असून भारतीय सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले गेले आहे. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यनानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे. यामुळे दहशतवादी संघटना बिथरल्या असून त्यांची निराशा व हतबलता या पत्रातून व्यक्त होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

leave a reply