जंगलात लपलेल्या शेकडो माओवाद्यांना कोरोनाचा संसर्ग – १० हून अधिक माओवाद्यांचा मृत्यू

- माओवाद्यांनी शरण येऊन उपचार घेण्याचा छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांच्या पोलीस दलांचा प्रस्ताव

रायपूर/हैदराबाद – देशात कोरोनाचे संक्रमण आता मोठ्या प्रमाणावर गावांमध्येही पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. इतकेच नव्हे दुर्गम भागातील जंगलांमध्ये लपून बसल्या माओवाद्यांपर्यंतही हा संसर्ग पोहोचला असल्याच्या बातम्या आहेत. छत्तीसगडच्या बस्तर आणि दांतेवाडामध्ये शेकडो माओवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही इनामी माओवादी नेतेही कोरोनाची लागण झाल्याने गंभीर असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकार उपचारासाठी जंगलात डॉक्टर पाठवू शकत नाही. त्यामुळे माओवादी शरण आल्यास त्यांच्यावर उपचार करता येतील, असा प्रस्ताव छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांसमोर ठेवला आहे. ही स्थिती केवळ छत्तीसगडमधील माओवाद्यांची नसून मध्य प्रदेश, तेलंगणामधूनही अशाच बातम्या येत आहेत. तसेच येथील पोलीसांनीही माओवाद्यांपुढे शरण येण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा संसर्गएका वृत्त अहवालानुसार माओवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या बस्तरमधील जंगलांमधील माओवाद्यांच्या तळावर कित्येक माओवादी कोरोनाच्या संसर्गाने आजारी आहेत. १०० हून अधिक माओवादी कोरोनाबाधीत झाले असून यामध्ये माओवाद्यांच्या नेत्यांचाही समावेश आहे. बस्तरमधील माओवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या सुजाता ही महिला माओवादी गंभीररित्या आजारी असल्याच्या बातमी छत्तीसगड पोलिसांना मिळाली आहे. तीला श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. सुजातावर २५ लाखाचे इनाम आहे. कित्येक माओवादी हल्ल्यांमध्ये तीचा सहभाग होता. २०१९ साली बस्तरमधील माओवादी नेता रमण्णा याच्या मृत्युनंतर येथील माओवाद्यांची सर्व सूत्रे सुजाताच्या हाती आल्याचे सांगितले जाते. याशिवाय याच भागात १० लाखांचा इनाम असलेले दोन माओवादी नेतेही कोरोनामुळे गंभीर असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या दक्षिण बस्तरच्या सुकमा, बजापूरमधील जंगलांमध्ये लपलेल्या माओवाद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. इतकंच नव्हे या भागाला लागून असलेल्या दांतेवाडातही कितीतरी माओवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या आहेत. दांतेवाडातील माओवाद्यांच्या सेंट्रल रिजनल कमिटीचा नेता सागर कोरोनाने गंभीर असल्याच्या बातम्या आहेत.

गुप्तचर यंत्रणांकडूनही अशा सूचना आंध्र प्रदेेश, तेलंगणा पोलीसांना मिळाल्या आहेत. माओवादी ऑनलाईन औषधे व पीपीई कीटसारख्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात माओवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी माओवाद्यांना कसलाही पुरवठा होऊ नये, यादृष्टीने पावले उचलली होती. यामुळे माओवाद्यांना अन्नही मिळणे मुश्कील झाले असून ते काहीही खाण्यास मजबूर झाले आहे. यामुळे कित्येक माओवादी अन्नविषबाधेनेही आजारी असल्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत. अशावेळी सुरक्षादलांनी माओवाद्यांसमोर शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. माओवादी बंदुकीच्या जोरावर सरकारविरोधात लढत असून त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत पोहोचविणे शक्य नाही. पण माओवादी शरण आल्यास त्यांच्यावर उपचार केले जातील, असे आवाहन छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी केले आहे.

leave a reply