अमेरिकेच्या सागरी वर्चस्वाला असलेला चीन-रशियाचा धोका रोखणे महत्त्वाचे

- नौदलाच्या अहवालातील इशारा

सागरी वर्चस्व

वॉशिंग्टन – ‘अमेरिका ही सागरी सत्ता असून या क्षेत्रातील प्रभावामुळे देशाची सुरक्षा व समृद्धी टिकून राहिली आहे. मात्र या शतकाच्या सुरुवातीपासून सागरी क्षेत्रात चीन व रशियाच्या आक्रमक कारवाया वाढल्याचे निदर्शनास आले आहे. हा अमेरिकेच्या सागरी वर्चस्वासाठी दीर्घकालिन धोका असून त्यांना रोखण्यासाठी वेगाने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. येत्या दशकात अमेरिकेकडून सागरी सुरक्षेसाठी करण्यात येणार्‍या तरतुदी २१व्या शतकात सागरी वर्चस्वाचा समतोल निश्‍चित करण्यात निर्णायक भूमिका बजावतील’, असा इशारा अमेरिकी नौदलाच्या अहवालात देण्यात आला आहे.

सागरी वर्चस्व

अमेरिकेचे नौदल, मरिन कॉर्प्स व तटरक्षक दलाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन सागरी सुरक्षेसंदर्भात स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. ‘अ‍ॅडव्हांटेज अ‍ॅट सी’ असे या अहवालाचे नाव असून, सागरी क्षेत्राशी संबंधित तिन्ही दले अमेरिकेचे वर्चस्व कायम राखण्यात कशी भूमिका पार पाडतील, याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. अहवालाच्या सुरुवातीलाच अमेरिका जागतिक सागरी क्षेत्रातील प्रमुख शक्ती असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे नौदल हे जगभरात देशाच्या संरक्षणसामर्थ्याचा प्रभाव दाखविणारे प्रमुख माध्यम असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेला मिळालेल्या विजयात नौदलाची भूमिका महत्त्वाची होती असे सांगून, २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून चीन व रशियाच्या सागरी क्षेत्रातील कारवाया वाढल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जगाच्या विविध भागात तैनात असणार्‍या अमेरिकी नौदलाला दररोज या कारवायांची माहिती मिळत असून हे दोन्ही देश सागरी क्षेत्रातील अमेरिकेचे मुख्य प्रतिस्पर्धी असल्याची जाणीव अहवालात करून देण्यात आली आहे. चीनचा उल्लेख सर्वात मोठा व दीर्घकालिन सामरिक धोका म्हणून करण्यात आला आहे.

सागरी वर्चस्व

‘आतापर्यंत अमेरिकी नौदल सागरी क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य कायम राखण्याबरोबरच आक्रमक कारवाया रोखणे व युद्ध जिंकून देणे यासारल्या जबाबदार्‍या सक्षमतेने पार पाडत आली आहे. मात्र चीनचे वर्तन व वाढते संरक्षणसामर्थ्य यामुळे या क्षमतेला आव्हान मिळताना दिसत आहे’, असे नौदलाने बजावले आहे. हे आव्हान रोखण्यासाठी तिन्ही दलांनी अधिक प्रमाणात एकत्र येणे व आधुनिकीकरणासाठी वेगाने पावले उचलणे या गोष्टी निर्णायक ठरतील असे आवाहन अहवालात करण्यात आले आहे. चीनच्या धोक्याचा उल्लेख करतानाच सध्या अमेरिकी नौदलाची जवळपास ६० टक्के तैनाती ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात चीनच्या नौदलाने आपल्या सामर्थ्यात वेगाने वाढ केली असून सध्या जगातील सर्वात मोठे नौदल म्हणून मान मिळविला आहे. चीनकडे सुमारे ३५०हून अधिक युद्धनौका असल्याचे सांगण्यात येत असून येत्या दशकभरात ही संख्या ४००च्या वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी नौदलाने अहवालात दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

leave a reply