भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे चीनवरील दडपण अधिकच वाढले

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या ब्रिगेडिअर्सची चर्चा सुरू झाली. मात्र, आधी पार पडलेल्या चर्चेच्या फेर्‍यांप्रमाणे यावेळची चर्चा देखील निष्फळ ठरण्याची दाट शक्यता आहे. घुसखोरी करून चीनने हा वाद सुरू केला, त्यामुळे आधी चीननेच आपले लष्कर माघारी घेऊन एप्रिल महिन्याच्या आधीची स्थिती बहाल करावी, अशी भारताची मागणी आहे. तर भारताने आपले सैन्य माघारी घ्यावे चीनचे म्हणणे आहे. याबाबतीत तडजोड करण्यास दोन्ही देशांनी नकार दिल्यामुळे, इथला तणाव कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याचे दिसते.

भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करुन तसेच गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांवर हल्ला चढवून चिनी लष्कराने भारताला आव्हान दिले होते. हे घुसखोरीचे प्रयत्न व गलवानमधील हल्ला, या दोन्ही आकस्मिक घटना नसून त्याचे आदेश थेट चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडूनच आले होते, असे भारतीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. भारताला आव्हान देऊन जेरीस आणायचे आणि आपल्या शर्ती मान्य करवून मगच इथून माघार घ्यायची, असा कट त्यामागे होता. यामुळे भारताचा अधिकाधिक भूभाग आपल्या टाचेखाली आणता येईल, त्याचवेळी चीनच्या विरोधातील आघाडीतला सहकारी देश म्हणून भारताकडे आशेने पाहणार्‍या देशांना इशारे देण्याचे मनसुबेही यामागे होते. मात्र, चीनचा हा डाव भारतीय लष्कराने चीनवरच उलटविला आहे.

गलवानमधील संघर्षात भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानांना सपाटून चोप दिल्यानंतर, पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील मोक्याच्या टेकड्या ताब्यात घेतल्या. तसेच भारतीय लष्कराचे यापुढचे धोरण आक्रमक असेल, असा संदेशही याद्वारे चीनला देण्यात आला आहे. पुढच्या काळात भारतीय सैन्य आक्रमक कारवाई करुन अधिक ठिकाणी ताब्यात घेऊ शकेल, अशी तयारी भारताने करायला हवी, असे भारतीय मुत्सद्दी व सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारत स्वीकारीत असलेल्या या आक्रमक भूमिकेचा गंभीर परिणाम चीनवर होऊ लागला आहे. त्यातच भारताने माघार घ्यावी म्हणून चीन आता आपल्या ताब्यात असलेला अक्साई चीनचा भूभाग भारतापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच चीनने या क्षेत्रात भुसूरूंग पेरल्याच्या बातम्या आल्या होत्या.

याबरोबरच लडाखच्या क्षेत्रात वाढू लागलेली थंडी चीनच्या जवानांना गारठवून टाकत आहे. त्यामुळे चीनचे लष्कर फार काळ इथे तग धरू शकणार नाही, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत. अशा विविध कारणांमुळे चीनची कोंडी झालेली आहे आणि लष्करी चर्चेत चीन कमकुवत ठरू लागल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र असे असले तरी, वरकरणी आक्रमक प्रदर्शन करुन चीनचे लष्कर आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण चीनच्या ह्या स्थितीचा फायदा उचलून भारताने चीनवरील दडपण अधिकच वाढवावे, असा सल्ला ज्येष्ठ मुत्सद्दी व विश्लेषक भारत सरकारला देत आहेत. पुढच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारताची भूमिका आक्रमकच असेल, असे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे भारत आपली तिबेटबाबतची भूमिकाही बदलू शकेल, असे दावे केले जातात.

दरम्यान, भारतीय वायुसेनेची रफायल विमाने लडाखच्या हवाई क्षेत्रात घिरट्या घालत आहेत. जर चीनच्या लष्कराने मुसंडी मारुन आपली कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला तर भारत आपल्या संपूर्ण क्षमतेनीशी प्रहार करील, याची जाणीव याद्वारे चीनला करून दिली जात आहे. आत्तापर्यंत चीनबरोबरच्या सीमावादात संयम दाखविणार्‍या भारताची बदललेली ही भूमिका चीनला फार मोठा मानसिक धक्का देत आहे व सध्या चीन या सीमावादात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडत असल्याचे निरिक्षण आंतरराष्ट्रीय माध्यमे नोंदवित आहेत.

leave a reply