फ्रान्स व ऑस्ट्रेलियासह भारत इंडो-पॅसिफिकमध्ये नौदल सराव करणार

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ‘क्वाड’च्या आघाडीत फ्रान्सला सहभागी करुन घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आता या सहकार्याचा पुढचा टप्पा म्हणून फ्रान्स व ऑस्ट्रेलिया सोबत भारत या सागरी क्षेत्रात संयुक्त सराव आयोजित करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. येत्या काळात चीन हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या हालचाली वाढवू शकतो, असा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह भारताचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नौदल सराव चीनच्या चिंतेत भर घालणारी बाब ठरू शकते.

नौदल सराव

आठवड्याभरापूर्वी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिवांमध्ये महत्त्वाची त्रिपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर तसेच येथील आर्थिक तसेच सामरिक आव्हानांचा सामना करण्यावर तीनही देशांच्या अधिकार्‍यांचे एकमत झाले. यामध्ये ‘मरिन ग्लोबल कॉमन्स’ या सागरी सहकार्याचाही समावेश होता. या चर्चेच्या पुढच्या चोवीस तासात फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी भारताला भेट दिली होती. रफायल विमानांच्या भारतीय वायुसेनेतील समावेशाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांची सदर भेट आयोजित करण्यात आली होती.

नौदल सरावया भेटीत फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत त्रिपक्षीय नौदल सरावाच्या मुद्द्याचा समावेश होता. त्याचबरोबर संरक्षणमंत्री पार्ली यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेऊन हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षा, आव्हाने आणि सहकार्यावर चर्चा देखील केल्याची माहिती फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्यूएल लेनिन यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना दिली. गेल्या काही वर्षांपासून भारताने फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियासह स्वतंत्र संरक्षण सहकार्य प्रस्थापित करुन युद्धसरावांचे आयोजन केले आहे. यापैकी फ्रान्स व भारतातील वरुण नौदल सरावात उभय देशांच्या युद्धनौका मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. गेल्या वर्षीच्या युद्धसरावात फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका व रफायल विमाने देखील सहभागी झाले होते.

आता ह्याच युद्धसरावाची व्याप्ती वाढवून यामध्ये ऑस्ट्रेलियाला देखील सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी फ्रान्स करीत आहे. या युद्धसरावासाठी भारत देखील अनुकूल असल्याचे दावे केले जातात. या व्यतिरिक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ‘क्वाड’मध्ये देखील ऑस्ट्रेलियाला सहभागी करावे, असा आग्रह अमेरिकेने धरला आहे. क्वाड’मधील ऑस्ट्रेलियाच्या सहभागाला भारत तयार असून पुढच्या महिन्याभरात भारताकडून यासंबंधी घोषणा अपेक्षित आहे.

leave a reply