अफगाण शांतीप्रक्रियेवर भारत व अमेरिकेची विस्तृत चर्चा

नवी दिल्ली – अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवल यांची भेट घेतली. यावेळी अफगाणिस्तान शांतीप्रक्रियेवर उभय देशांच्या नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा पार पडल्याची माहिती अमेरिकी विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी दिली. अफगाणी सरकार आणि तालिबानमधील या वाटाघाटीतून संघर्षबंदी लागू व्हावी आणि अफगाणिस्तानात राजकीय स्थैर्य निर्माण व्हावे, यावर अमेरिका व भारताचे एकमत झाल्याची माहिती अमेरिकी दूतावासाने दिली.

विस्तृत चर्चा

चार दिवसांपूर्वी कतारची राजधानी दोहा येथे अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये वाटाघाटी पार पडल्या. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या वाटाघाटींबाबत भारताची भूमिका परखडपणे मांडली होती. मंगळवारी अमेरिकी विशेषदूत खलिलझाद यांच्याबरोबर झालेल्या भेटीतही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या वाटाघाटीतून अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण होणार नाही आणि महिलांचे अधिकार सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतावरील दहशतवादी हल्ल्यांसाठी केला जाणार नाही, याची हमी या शांतीप्रक्रियेतून मिळणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका भारताने मांडली.

तर अफगाणिस्तानातील ही शांतीप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अफगाणिस्तानचा क्षेत्रीय सहकारी देश म्हणून भारताने महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन अमेरिकी विशेषदूत खलिलझाद यांनी केले. सदर शांतीप्रक्रियेचे उद्दीष्ट गाठण्यासाठी भारत व अमेरिका संयुक्तपणे काम करतील, अशी अपेक्षा खलिलझाद यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष मिटवून शांती प्रस्थापित करणे मुख्य उद्दीष्ट असले तरी येत्या काळात अफगाणिस्तानात राजकीय स्थैर्य निर्माण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी असेल, असे खलिलझाद म्हणाले. गेल्या दोन वर्षात खलिलझाद यांनी भारताला दिलेली ही पाचवी भेट आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबानला राजकीय प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय स्तरावर हे प्रयत्न सुरू असले तरी तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले थांबलेले नाहीत. दोहा येथील वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी आणि वाटाघाटी संपल्यानंतरही अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांसाठी तालिबान जबाबदार असल्याचा आरोप केला जातो.

leave a reply