चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत व व्हिएतनाम इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढविणार

नवी दिल्ली/हनोई – चीनच्या वर्चस्ववादी चिथावणीखोर कारवायांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत व व्हिएतनाम या दोन्ही देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ‘इंडिया-व्हिएतनाम जॉइंट कमिशन’ची १७ वी बैठक पार पडली. या ‘व्हर्च्युअल’ बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, व्हिएतनामला ‘इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’ मध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही देशांमध्ये आर्थिक व संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला गती देण्याबरोबरच अणुऊर्जा, अंतराळ क्षेत्र सागरी विज्ञान व नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित भागीदारी दृढ करण्यावरही एकमत झाले.

भारत व व्हिएतनाम

गेल्या काही महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट राजवटिने आपल्या विस्तारवादी धोरणाचा अंतर्गत आक्रमक कारवाया सुरू केल्या आहेत. भारताबरोबरील नियंत्रणरेषेवर असलेल्या गलवान व्हॅलीमध्ये झालेला संघर्ष आणि व्हिएतनामच्या जहाजाला धडक देऊन बुडविणे व हवाई हद्दीनजिक बॉम्बर विमानांची तैनाती चीनच्या चिथावणीखोर कारवायांचाच भाग मानला जातो. त्यामुळे या दोन्ही देशांनी चीनविरोधी आघाडीच्या दृष्टिकोनातून एकत्र येणे महत्त्वाचे ठरते. मंगळवारी उभय देशांमध्ये साऊथ चायना सी क्षेत्रासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवायांच्या मुद्द्यावर प्राधान्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

भारत व व्हिएतनाम

‘इंडिया-व्हिएतनाम जॉईंट कमिशन’च्या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि व्हिएतनामचे परराष्ट्रमंत्री फाम बिन्ह मिन्ह यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक आणि संरक्षण संबंधांना नवीन उर्जा देण्यास सहमती दर्शविण्यात आली. तसेच नागरी अणुऊर्जा, अवकाश यासारख्या क्षेत्रात सहकार्याच्या अधिक संधी शोधून काढण्याबाबतही एकमत झाले. यावेळी राजनैतिक तसेच सागरी क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या दोन परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. संयुक्त राष्ट्रसंघ तसेच ‘आसियन’च्या माध्यमातून भागीदारी मजबूत करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहितीही दोन्ही देशांच्या सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी साऊथ चायना सी क्षेत्रात व्हिएतनाम दावा करीत असलेल्या पॅरासेल बेटांनजिक चीनकडून युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. त्यावर व्हिएतनामने, चीन आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करीत असल्याचे सांगून, चीन या क्षेत्रातील परिस्थिती अधिक धोकादायक बनवित असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्याचवेळी भारतातील व्हिएतनामचे राजदूत फाम सान्ह चाउ यांनी, परराष्ट्रसचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी झालेल्या बैठकीत साऊथ चायना सी क्षेत्रातील या वाढत्या तणावासंदर्भात माहिती दिली होती. भारताने व्हिएतनामबरोबर सागरी क्षेत्रातील इंधन उत्खननाबाबत करार केले असून संरक्षण सहकार्य देण्याचेही मान्य केले आहे.

leave a reply