भारताकडून 43 चिनी ॲप्सवर बंदीची घोषणा

नवी दिल्ली/बीजिंग – चीनमधून भारतावर मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असल्याचे अहवाल समोर येत असतानाच, भारताने चीनच्या आणखी 43 ॲप्सवर बंदीची घोषणा केली आहे. या ॲप्समध्ये शॉपिंग, व्हिडिओ तसेच डेटिंग ॲप्सचा समावेश आहे. चीन व पाकिस्तानच्या यंत्रणा भारताविरोधात हेरगिरी करण्यासाठी डेटिंग ॲप्स व वेबसाईट्सचा वापर करीत असल्याची माहिती यापूर्वी सुरक्षायंत्रणांकडून देण्यात आली होती. त्यामुळे चीनच्या ॲप्सवर घालण्यात आलेली बंदी लक्षवेधी ठरत आहे.

ॲप्सवर बंदीची घोषणा

गलवान खोऱ्यातील चीनच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने चीनच्या विरोधात आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. यात चीनच्या ॲप्सवर बंदी टाकण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानुसार जून महिन्यात 59, जूलैमध्ये 47, सप्टेंबर महिन्यात 118 आणि आता 43 चिनी ॲप्सवर बंदी टाकण्यात आली आहे. या 43 ॲपमध्ये विख्यात चिनी उद्योजक जॅक मा यांच्या अलीबाब कंपनीच्या चार ॲप्सचाही समावेश आहे. भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान व इलेक्टॉनिक्स मंत्रालयाने या चिनी ॲप्सवरील बंदीची घोषणा केली.

देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन या ॲप्सवर बंदीची घोषणा करण्यात आली आहे. यात मुख्यत्वे डेटिंग ॲप्स असल्याचे सांगितले जाते. या ॲप्सचा वापर करून अधिकारी तसेच जवानांना लक्ष्य केले जाते व त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले जातात. अशा स्वरुपाच्या तक्रारी समोर आल्यानंतर ही बंदी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही चीन तसेच पाकिस्तानच्या यंत्रणा भारतावर सायबर हल्ले चढविण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करीत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

ॲप्सवर बंदीची घोषणा

दरम्यान, सिंगापूरच्या एका सायबर सुरक्षेशी निगडीत असलेल्या कंपनीने भारतावर सायबर हल्ले चढविणाऱ्या गटांची माहिती उघड केली. यामध्ये चार गटांचा समावेश असून यातले दोन गट चिनी, एक गट पाकिस्तानी, तर एक गट उत्तर कोरियाचा आहे. या तिन्ही देशांमधील गटांकडून भारतावर होणाऱ्या सायबर हल्ल्यांना चीन, पाकिस्तान व उत्तर कोरियाच्या राजवटींचे सहाय्य लाभत असल्याचा संशय सदर कंपनीने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. याआधी अमेरिका, ब्रिटन तसेच इतर पाश्‍चिमात्य देशांनी आपल्यावर होणाऱ्या सायबर हल्ल्यांमागे चीनचा हात असल्याचा आरोप केला होता.

काही आठवड्यांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी देशात होणाऱ्या सायबर हल्ले आणि सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात सुमारे 500 टक्क्यांची वाढ झाल्याचे म्हटले होते. यावर डोवल यांनी चिंता व्यक्त करून देशवासियांना या आघाडीवर सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. चीनबरोबरील भारताचे संबंध बिघडलेले असताना, नजिकच्या काळात चीनकडून होणाऱ्या अधिक तीव्रतेच्या सायबर हल्ल्यांची शक्यता वाढली आह. या पार्श्‍वभूमीवर, भारत सरकार चिनी ॲप्सवर बंदी टाकून सुरक्षेसाठी आवश्‍यक ती खबरदारी घेत असल्याचे दिसत आहे.

leave a reply