भारत आशियातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनला

 नवी दिल्ली/मुंबई,  (वृत्तसंस्था) –  देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख ६५ हजारांजवळ पोहोचली आहे. यामुळे भारत आशियातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनला आहे. आतापर्यंत तुर्की आशियातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला देश होता. गुरुवारी महाराष्ट्रात या साथीने ८५ जण दगावले, तर २,५९८ नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६० हजारांजवळ पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतच ३५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत चोवीस तासात ३८ जण दगावले, तर १,१४३८ नव्या रुग्णांची भर पडली.  या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘चेस द व्हायरस’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. याद्वारे चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्याची ओळख पटविणे आणि विलगीकरणाची मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्ये देशातील हॉटस्पॉट ठरली आहेत. या सहा राज्यातच सुमारे एक लाख रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. गुरुवारी दिल्लीत एकाच दिवसात हजार नवे रुग्ण आढळले. हा या राज्यातील एका दिवसात नोंद झालेल्या कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक ठरतो. तामिळनाडूतही चोवीस तासात ८०० हुन अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे या राज्यातील रुग्ण संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे. 

गुरुवारीही महाराष्ट्रात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. मुंबई राज्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईत चोवीस तासात सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी ३६ जण धारावीतील आहेत. तसेच दादर भागात ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचारी आणि पोलीस वसाहतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.  माहीम भागात ८६ नव्या रुग्णांची नोंद झाली यातील ५९ जण पोलीस वसाहतींमधील होते, तर २७ जण आरोग्य कर्मचारी होते, अशी माहिती समोर येत आहे.

leave a reply