भारत जगातील दुसऱ्या क्रमाकांचा पीपीई किट्सचा उत्पादक देश बनला

नवी दिल्ली – ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह एक्विपमेंट’ (पीपीई) कीटची आयात करणारा भारत या क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमाकांचा उत्पादक देश बनला आहे. देशात पाच लाखांहून अधिक पीपीई किट्सचे दररोज उत्पादन होत आहे. तसेच व्हेन्टिलेटरच्या निर्मितीतही अगदी थोड्या कालावधीत देशी उत्पादनाची क्षमता वर्षाकाठी तीन लाखांपर्यंत वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. सदानंद गौडा यांनी दिली आहे.

गुरुवारी ‘इन्व्हेस्ट इंडिया फार्मा ब्यूरो ॲण्ड डिपार्टमेंट ऑफ फार्मासिटिकल्स’ने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये गौडा बोलत होते. सुरूवातीला पीपीई किट्सचा आयातदार देश अशी ओळख असलेल्या भारताने पीपीई कीट निर्मिती क्षेत्रात फार मोठी झेप घेतली आहे. आज आपल्या देशात दिवसाला पाच लाखांहून अधिक पीपीई कीटचे उत्पादन होत आहे, ही माझ्यासारख्या कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरते, असे गौडा म्हणाले.

तसेच व्हेन्टिलेटरच्या निर्मितीतही देशी उत्पादनाची क्षमता वर्षाकाठी तीन लाखांपर्यंत वाढली आहे. हे लक्ष्य केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्रातील विविध विभाग आणि संस्था यांच्यात चांगले समन्वय साधून गाठले गेले आहे, असे केंद्रीय रसायन व खतमंत्री डी. सदानंद गौडा यांनी म्हणाले.

देशात कोरोनाव्हायरस फैलावत गेल्यानंतर सरकारने इतर देशांमधून पीपीई किट्सची आयात केली. पण रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पीपीई किट्सचा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर देशातल्या ५२ खाजगी कंपन्यांनी पीपीई किट्सची निर्मिती सुरु केली. यात डीआरडीओ आणि ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड’ने युद्धपातळीवर काम सुरू केल्यानंतर हे लक्ष्य गाठण्यात आले आहे.

यावेळी गौडा यांनी स्वदेशी वैद्यकीय उपकरणांच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. आरोग्य सेवा स्वस्त आणि उपलब्ध करण्यामध्ये या उपकरणांची मोठी भूमिका आहे. ही उपकरणे तपासणी, उपचारासाठी प्रगत शस्त्रक्रिया, आरोग्य निर्देशांकाच्या देखरेखीसाठी महत्त्वपूर्ण आहेत असेही गौडा यांनी म्हटले आहे. फार्मासिटिकल्स विभागाने औषध उत्पादन आणि वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीच्या क्षेत्रात देशांतर्गत क्षमता वाढविण्यासाठी अनेक उपाय केले आहेत, असे गौडा म्हणाले.

leave a reply