भारताने ताब्यात घेतलेल्या चिनी जवानाला चीनच्या लष्कराकडे सोपविले

नवी दिल्ली – भारताने पूर्व लडाखच्या डेमचॉक भागातून ताब्यात घेतलेल्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) जवानाला पुन्हा चीनकडे सोपविले. भारतीय सैनिकांनी कसून चौकशी केल्यानंतरच त्याला चिनी लष्कराच्या हवाली करण्यात आले. येत्या काही तासात भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांमध्ये आठव्या टप्प्यातील बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सद्‍भावना प्रदर्शित करण्यासाठी सदर या चिनी जवानाला मुक्त करण्यात आले. पण असे असले तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतच्या (एलएसी) वादात भारताच्या भूमिकेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा केला जातो.

ताब्यात घेतलेल्या

दोन दिवसांपूर्वी डेमचॉकमधून या जवानाला ताब्यात घेण्यात आले होते. ‘एलएसी’ ओलांडून भारताच्या हद्दीत दाखल झालेल्या या चिनी जवानाची प्रकृती खालावल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले होते. त्याला ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपडे देण्यात आले. वँग या लाँग असे नाव असलेला हा जवान चीनच्या झेजियांग प्रांताचा रहिवाशी होता. आपला हा जवान चिनी लष्करात शस्त्रास्त्रे दुरूस्त करण्याचे काम करीत असल्याचा दावा ‘पीएलए’ने केला. सीमेवरील गुराख्यांना रस्ता दाखविण्याच्या प्रयत्‍नात आपला जवान वाट भरकटून भारताच्या हद्दीत घुसल्याचा खुलासा चीनने केला होता.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती पाहता, चीनच्या या दाव्याकडे संशयाने पाहिले जात होते. त्यातच या जवानाकडे चीनची नागरी व लष्कराची कागदपत्रे आढळल्यानंतर भारतीय सैनिकांनी सावधगिरी बाळगून त्याची कसून चौकशी केली. चीनचा हा जवान हेरगिरीच्या मोहिमेवर होता का, त्याचासुद्धा तपास करण्यात आला. दोन दिवसांच्या कसून चौकशीनंतर प्रस्थापित शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या जवानाला पुन्हा चीनच्या हवाली करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून ‘एलएसी’वर प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांनी ‘एलएसी’जवळ जवळपास ५० ते ६० हजार सैनिक तसेच रणगाडे, तोफा, लढाऊ विमाने, रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे देखील तैनात केली आहेत. ‘एलएसी’वरील या तणावावर चर्चा करण्यासाठी येत्या दोन दिवसात भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा काढण्यासाठी चीन जोरदार प्रयत्‍न करण्याची शक्यता आहे.

कारण लडाखमधील तापमान खाली घसरत चालले असून या महिन्याच्या अखेरीस बर्फाचे थर साचण्यास सुरुवात होईल. पुढच्या महिन्याभरात येथील तापमान उणे २० च्याही खाली जाईल. त्यामुळे या शेवटच्या चर्चेत फारसे काही निष्पन्न होणार नसल्याचे ओळखून चीनने आपल्या जवानांच्या प्रदीर्घ तैनातीची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आपल्या जवानांच्या तैनातीसाठी चीनने अब्जावधी डॉलर्सचे तंबूचे ऑर्डर्स दिले असून नव्या रायफल्स पुरविल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

leave a reply