‘मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत अतिशय महत्त्वाचा

- ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस

मुंबई – ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह मुंबई बंदरात झाली आहे. लवकरच भारत व ब्रिटनच्या संरक्षणदलांचा संयुक्त सराव होणार असून उभय देशांमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव ठरेल. याबरोबर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस, संरक्षणदलप्रमुख जनरल सर निकोलस कार्टर तसेच नौदलप्रमुख ऍडमिरल रडाकिन यांची भारतातील उपस्थिती दोन्ही देशांच्या भक्कम होत असलेल्या सामरिक सहकार्याचा दाखला देत आहे. ‘मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत अतिशय महत्त्वाचा ठरतो, असे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत अतिशय महत्त्वाचा - ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुसब्रिटनच्या नौदलातील ‘क्विन एलिझाबेथ’ ही सर्वात प्रगत विमानवाहू युद्धनौका मानली जाते. या युद्धनौकेने आपल्या ताफ्यासह साऊथ चायना सी क्षेत्रात गस्त घातली होती. तसेच अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर क्विन एलिझाबेथचा युद्धसरावही पार पडला होता. हे सारे चीनला सज्जड इशारा देण्यासाठीच होते, हे लपून राहिलेले नाही. साऊथ चायना सी क्षेत्राबरोबरच इंडो-पॅसिफिकमधील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांमुळे जगभरातील प्रमुख देशांच्या चिंता वाढल्या आहेत. यामध्ये ब्रिटनचाही समावेश असून ब्रिटन देखील आपल्या हितसंबंधांना चीनपासून असलेल्या धोक्याकडे अत्यंत सावधानतेने पाहत आहे.

अशा परिस्थितीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताचे स्थान व सामर्थ्य लक्षात घेऊन ब्रिटनने भारताबरोबर सर्वच आघाड्यांवरील सहकार्य भक्कम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ‘सागरी क्षेत्र व यातील व्यापारी मार्गांची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कठोर निर्णयक्षमतेची व सामर्थ्य प्रदर्शनाची आवश्यकता आहे. मुंबर्ईच्या बंदरात दाखल झालेला ब्रिटनच्या नौदलाचा ताफा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ब्रिटनच्या धोरणात झालेल्या कृतिशील बदलांची साक्ष देत आहे. ब्रिटन भारतासारख्या आपल्या समविचारी देशांबरोबर घनिष्ठ सहकार्य प्रस्थापित करून आपली आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडत आहे, अशा शब्दात ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी भारताबरोबरील सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

‘मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच वेगाने आर्थिक प्रगती करीत असलेल्या भारताबरोबर ब्रिटन जगभरात स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या देशांचे नेटवर्क उभारत आहे’, असा दावा ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. दरम्यान, आपल्या या भेटीत परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस ताजमहाल हॉटेलला भेट देऊन मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. ब्रिट भारताबरोबर तंत्रज्ञान व व्यापारी सहकार्य करण्यासाठी अतिशय उत्सुक असून यासाठी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आपल्या दौर्‍याच्या आधीच दिली होती.

दरम्यान, भारताचे ब्रिटनबरोबरील हे सहकार्य क्वाड अर्थात भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या संघटनाला अधिकच बळ देईल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो चीनच्या विस्तारवादी कारवाया रोखण्यासाठी लोकशाहीवादी देशांची संघटना उभी करण्याचे प्रयत्न ब्रिटनने याआधी केले होते. डी-१० या नावाने हा गट तयार करून ब्रिटन चीनसारख्या हुकूमशाहीवादी देशासमोर नवे आव्हान उभे करणार असल्याचे दावे करण्यात आले होते. हॉंगकॉंगवर चीन पूर्ण वर्चस्व मिळविण्याची तयारी करीत असताना, ब्रिटनने त्याविरोधात चीनल इशारा दिला होता. पण चीनने त्याकडे दुर्लक्ष करून हॉंगकॉंगवरील आपली पकड घट्ट करण्यासाठी आक्रमक पावले उचलली होती. यानंतर ब्रिटनने चीनला विरोधात आक्रमक निर्णय घेण्याचे सत्र सुरू केले होते.

leave a reply