चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-इंडोनेशियामध्ये संरक्षण सहकार्य विस्तारणार

नवी दिल्ली – भारत भेटीवर आलेले इंंडोनेशियाचे संंरक्षणमंत्री जनरल प्रबोवो सुबियान्तो यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक सहकार्य भक्कम करण्यावर यावेळी भर देण्यात आला. इंडोनेशियाला संरक्षण तंत्रज्ञान पुरविण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच इंडोनेशियाला भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्र पुरवू शकतो, अशा बातम्या आहेत. त्यामुळे चीनबरोबर तणाव वाढला असताना दोन्ही देशांबरोबर झालेल्या या संरक्षणविषयक चर्चेचे महत्व वाढले आहे.

India-Indonesiaरविवारी इंंडोनेशियाचे संंरक्षणमंत्री जनरल प्रबोवो सुबियान्तो तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दाखल झाले होते. सोमवारी दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत भारत आणि इंडोनेशियाच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा पार पडली. यावेळी संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग, वायुसेना प्रमुख आर. के. एस भदोरिया संरक्षण सचिव अजय कुमार आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ही चर्चा सकारात्मक झाली. दोन्ही देशांमधील राजकीय संवादाची परंपरा आहे आणि गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधील आर्थिक देवाणघेवाण वाढली आहे. दोन्ही देशांमधील सार्वजनिक स्तरावरील आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे संबंधही अधिक दृढ झाले आहेत, असे राजनाथ सिंग म्हणाले. इंडोनेशियाबरोबर वाढलेल्या लष्करी पातळीवर सहकार्याबद्दल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीत नौदल सहकार्य विस्तारण्यावर चर्चा झाली. लडाख आणि साऊथ चायना सी क्षेत्रात चीनच्या आक्रमकतेवरही चर्चा झाल्याचे दावे बातम्यांमधून करण्यात येत आहेत. भारताने इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देण्याची तयारी दाखविल्याचे दवेही काही वृत्तांमध्ये करण्यात आले आहेत.

इंडोनेशिया ‘साऊथ चायना सी’वरील चीनच्या दाव्याविरोधात या क्षेत्रातील इतर देशांप्रमाणे खडा ठाकला आहे. तसेच इंडोनेशियाचे सबांग बंदर हिंदी महासागर आणि पॅसिफिक समुद्राला जोडणाऱ्या मलाक्का सामुद्रीधुनीच्या मुखाशी असून दोन वर्षांपूर्वी हे बंदर भारताला लष्करी वापरासाठी खुले करण्याचा निर्णय इंडोनेशियाने घेतला होता. गलवानमधील संघर्षानंतर मलाक्का सामुद्रीधुनी जवळ भारतीय नौदलाने तैनाती वाढविली आहे. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडणारा जलमार्ग असलेल्या मलाक्का समुद्रीधुनीतूनच चीनचा बहुतांश व्यापार व इंधन वाहतूक होते. त्यामुळे संघर्ष काळात हा मार्ग बंद पडल्यास चीनची आर्थिक कोंडी केली जाऊ शकते.

त्यामुळे चीन ‘साऊथ चायना सी’ मध्ये आक्रमक झाला असताना आणि गलवानमधील संघर्षानंतर भारताच्या नौदलाने मलाक्कामध्ये तैनाती वाढविली असताना इंंडोनेशियाचे संंरक्षणमंत्र्यांच्या या भारत दौऱ्याचे महत्व वाढले आहे. इंडोनेशियाला ब्रम्होस क्षेपणास्त्र पुरविण्याची भारताने दाखवलेल्या तयारीची बातमी चीनच्या चिंता वाढविणारी आहे.

leave a reply