संयुक्त राष्ट्रसंघटनेत चीनला भारताचा धक्का

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रसंघटनेत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘सीएसडब्ल्यू’ गटाच्या निवडणुकीत भारताने चीनला जबरदस्त धक्का दिला. या गटातील सदस्यत्वासाठी झालेल्या मतदानात चीनला एकूण सदस्यसंख्येच्या ५० टक्क्यांचा आकडाही पार करता आला नाही. गेल्या काही वर्षांत चीनने अमेरिकेच्या प्रभावाला शह देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. ‘सीएसडब्ल्यू’मधील पराभवाने त्याला हादरा बसला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेत चीनला भारताचा धक्काभारताचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील प्रतिनिधी ‘टी. एस. तिरुमूर्ती’ यांनी ‘सीएसडब्ल्यू’मधील यशाची माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ‘इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल’चा भाग असणाऱ्या ‘कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन’च्या (सीएसडब्ल्यू) सदस्यत्वासाठी सोमवारी निवडणूक झाली. दोन सदस्यांच्या निवडीसाठी गटाच्या ५४ सदस्यांनी मतदान केले. त्यात भारत व अफगाणिस्तान या दोन देशांनी ७० टक्क्यांहून अधिक मते मिळवित बाजी मारली. चीनला जेमतेम ५० टक्केच मते मिळाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. सदस्य पदी निवड झाल्यानंतर भारताने आपल्याला मतदान करणाऱ्या सर्व सदस्य देशांचे आभार मानले आहेत.

१९९५ साली चीनने ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन’ आयोजित केली होती. महिलांना सक्षम करण्याच्या मुद्यावर चीनची राजवट गांभीर्याने काम करीत असल्याचा दावा यातून करण्यात आला होता. मात्र त्याला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच चीन संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महिलांबाबत कार्यरत असणाऱ्या प्रमुख गटात स्थान मिळविण्यात अपयशी ठरला आहे. यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधात असलेली नाराजी व असंतोष पुन्हा एकदा दिसून आला आहे. काही महिन्यांपूर्वी कम्युनिस्ट पार्टीची धोरणे संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ठरावात घुसविण्याचा चीनचा प्रयत्न भारतासह युरोपीय देशांनी उधळला होता.

leave a reply