मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताचा चीनला धक्का

नवी दिल्ली – दरवर्षी आयोजित होणार्‍या मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला नवा धक्का दिला आहे. यामुळे आतापर्यंत राजनैतिक स्तरावर कार्यरत असलेली भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियातील यांची ‘क्वाड’ संघटना सामरिक स्तरावरही सक्रीय बनू लागली आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनबरोबर तणाव निर्माण झालेला असताना भारताचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरतो. भारताच्या या निर्णयाची चीनने दखल घेतली असून यामुळे भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षा उघड झाल्याचा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला.

मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताचा चीनला धक्कानोव्हेंबर महिन्यात भारत, अमेरिका आणि जपान यांच्या नौदलातील मलाबार युद्धसराव आयोजित होणार आहे. या युद्धसरावात भारताने ऑस्ट्रेलियालाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी अमेरिकेने गेल्या काही आठवड्यांपासून लावून धरली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चारही लोकशाहीवादी देशांचा हा युद्धसराव या क्षेत्रातील स्थैर्यासाठी आवश्यक असल्याची भूमिका अमेरिकेने मांडली होती. काही दिवसांपूर्वी जपानमध्ये पार पडलेल्या या चारही देशांच्या ‘क्वाड’च्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली होती. चीनबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत यासंदर्भात निर्णय घेऊ शकतो, असे बोलले जात होते. अशा परिस्थितीत, सोमवारी भारताने यंदाच्या युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात भक्कम आघाडी उघडल्याचा संदेश दिला आहे.

मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताचा चीनला धक्कास्वतंत्र, मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘क्वाड’ वचनबद्ध असून मलाबारमधील ऑस्ट्रेलियन नौदलाला आमंत्रित करण्यामागेही हेच उद्देश असल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. तर मलाबार युद्धसराव ही आपल्या देशासाठी मोठी संधी असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी दिली. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर सावध प्रतिक्रिया नोंदविली आहे. मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला सहभागी करण्याच्या निर्णयाची दखल चीनने घेतली असून हा निर्णय क्षेत्रीय शांती व स्थैर्यासाठी हितकारक ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरील आपले लष्करी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारताचे प्रयत्‍न सुरू असून मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताने आपले इरादे स्पष्ट केल्याची टीका ग्लोबल टाईम्स या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने केली. त्याचबरोबर ‘क्वाड’ ही संघटना ‘एशियन नाटो’ बनू शकत नसल्याचा शेराही या चिनी मुखपत्राने मारला.

मलाबार युद्धसरावात ऑस्ट्रेलियाला आमंत्रित करुन भारताचा चीनला धक्कादरम्यान, ऑस्ट्रेलियाला मलाबार युद्धसरावासाठी आमंत्रित करुन सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी खेळणार्‍या भारताच्या या निर्णयावर जगभरातील लष्करी विश्लेषकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. पाच वर्षांपूर्वी जपान आणि आत्ता ऑस्ट्रेलियाला मलाबार युद्धसरावात सहभागी करुन भारताने कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा स्पष्ट संदेश आपल्या या एका निर्णयातून दिल्याचे युरोपातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने ऑस्ट्रेलियाला मलाबार युद्धसरावात सहभागी करुन घेण्यासाठी निवडलेली वेळ सर्वात महत्त्वाची ठरत असल्याचे अमेरिकास्थित रँड कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अभ्यासक डेरेक ग्रॉसमॅन यांनी म्हटले आहे.

leave a reply