कोरोनाच्या विरोधातील मोहिमेत भारत जगाचे नेतृत्व करीत आहे

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांची प्रशंसा

संयुक्त राष्ट्रे – कोरोनाच्या साथीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भारताने जगातील १५०हून अधिक देशांना विविध प्रकारची मदत पुरविली आहे. कोरोनाविरोधातील मोहिमेत भारत जगाचे नेतृत्त्व करीत आहे, या शब्दात संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी भारताची प्रशंसा केली. गुतेरस यांनी भारताच्या या कामगिरीबद्दल स्वतंत्र पत्र लिहिले असून वैयक्तिक पातळीवरही भारताचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेतील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी याची माहिती दिली.

Advertisement

गेल्या काही महिन्यात कोरोनाविरोधात लस विकसित करण्यात यश आले असून जगातील प्रमुख देशांमध्ये व्यापक पातळीवर लसीकरणही सुरू झाले आहे. ही मोहीम सुरू असतानाच अमेरिका, कॅनडा व काही युरोपिय देशांनी जगातील लसींचा अतिरिक्त साठा करण्यास सुरुवात केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. प्रगत देशांच्या या भूमिकेमुळे आफ्रिका व आशियातील अनेक छोट्या तसेच अविकसित देशांना लस मिळत नसल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रसंघटनेने ठेवला होता.

लस विकसित होण्यापूर्वी भारताने जगातील अनेक देशांना अत्यावश्यक वैद्यकीय सामुग्री व औषधांचा पुरवठा केला होता. त्यानंतर भारताने आपल्याकडे तयार झालेल्या लसींचा पुरवठा इतर देशांना करण्यासाठी पुढाकार घेतला. ‘व्हॅक्सिन मैत्री’ या उपक्रमाअंतर्गत भारताने जवळपास २०हून अधिक देशांना लाखो लसींचा पुरवठा केला आहे. त्यापाठोपाठ भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीमोहिमांचा भाग असणार्‍या सुमारे एक लाख जवानांना लस पुरविण्याची घोषणाही केली. कोरोनाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भारताकडून देण्यात आलेल्या योगदानाची संयुक्त राष्ट्रसंघटनेने सर्वोच्च पातळीवर दखल घेतल्याचे महासचिव अँटोनियो गुतेरस यांच्या पत्रावरून स्पष्ट होते.

‘कोरोनाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत भारत जगाचे नेतृत्त्व करीत आहे. भारताने आतापर्यंत १५०हून अधिक देशांना जीवनावश्यक औषधे, निदान करणारी किट्स, व्हेंटिलेटर्स व वैयक्तिक सुरक्षाविषयक सामुग्री पुरविली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आणीबाणीच्या काळासाठी दोन लसींना मान्यता दिली असून त्यातील एक लस भारतातील आहे. भारताने लस विकसित व निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक लसींचा पुरवठा शक्य झाला आहे. कोव्हॅक्स उपक्रमाला भारताने दिलेला पाठिंबा व करण्यात येत असलेले सहकार्य, यासाठी आपण भारताचे मनापासून आभार मानतो’, या शब्दात महासचिव गुतेरस यांनी भारताची प्रशंसा केली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे वैयक्तिक स्तरावर आभारही व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखण्यात येतो. कोरोनाच्या काळात भारताने दिलेले योगदान या उपाधीला सार्थ ठरविणारे ठरले असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी केलेली प्रशंसा त्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

leave a reply