भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघात इम्रान खान यांच्या ‘नया पाकिस्तान’चे वाभाडे

संयुक्त राष्ट्रसंघ – ”इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ म्हणजे कुणीही घरी सुखरुप न परतण्याची हमी देणारा पाकिस्तान आहे”, असा सणसणीत टोला संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे फर्स्ट सेक्रेटरी ‘सेंथिल कुमार’ यांनी पाकिस्तानला लगावला. दुसर्‍या देशांवर मानवाधिकारांच्या हननाचा ठपका ठेवणार्‍या पाकिस्तानने स्वतःच्या देशात काय चालले आहे ते आधी पहावे, असा शेराही भारताने मारला. तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार तोंडघशी पडल्यानंतरही संयुक्त राष्ट्रसंघात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला भारताने चपराक लगावली. दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये, असा इशारा भारताने दिला.

'नया पाकिस्तान'

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत भारतावर दोषारोप करणार्‍या पाकिस्तानचा भारताने चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानचे सुरक्षादल पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली नागरिकांचे अपहरण आणि हत्या करतात. पाकिस्तानची न्यायव्यवस्था तिथल्या जनतेच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. पाकिस्तानमध्ये महिलांवर अत्याचार होतात. इथल्या पत्रकारांना हत्येच्या धमक्या मिळतात. हाच इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ असल्याचे सांगून संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे फर्स्ट सेक्रेटरी ‘सेंथिल कुमार’ यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले.

'नया पाकिस्तान'या ‘नया पाकिस्तान‘मध्ये घरी परतण्याची गॅरंटी देता येत नाही, असा सणसणीत टोला सेंथिल कुमार यांनी लगावला. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक नेते, पत्रकार यांचे बेपत्ता होणे, अल्पसंख्यांक तसेच विरोधकांचे अपहरण, हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. या विरोधात आवाज उठविणार्‍यांवर पाकिस्तानी सुरक्षादलांकडून कारवाई केली जाते, याकडे कुमार यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी ‘विदिषा मैत्रा’ यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणे, हा पाकिस्तानचा ट्रेडमार्क बनला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना प्रशिक्षण देत असल्याचे आता उघड झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना ‘शहीद’ अशी उपमा दिली होती याची आठवण मैत्रा यांनी यावेळी करुन दिली. इतकेच नाही तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचा छळ होत असल्याचे मैत्रा यांनी लक्षात आणून दिले. संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष पाकिस्तानवरुन दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तान ही धडपड करीत असल्याचा टोला मैत्रा यांनी लगावला आहे.

leave a reply