सीमेबाबत चीनने केलेल्या कायद्यावर भारताचा आक्षेप

नवी दिल्ली – आपले सार्वभौमत्त्व आणि अखंडतेला असलेल्या धोक्याविरोधात सीमेवरील कारवाईसाठी चिनी लष्कराला विशेष अधिकार देण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. एलएसीवर भारत व चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने घेतलेल्या या निर्णयाचे लक्ष्य भारतच असल्याचे समोर येत आहे. याची गंभीर दखल भारताने घेतली. चीनचा हा एकतर्फी निर्णय या देशाच्या भारताबरोबरील द्विपक्षीय करारांवर परिणाम करणारा ठरतो, असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला.

सीमेबाबत चीनने केलेल्या कायद्यावर भारताचा आक्षेप१ जानेवारी २०२२ पासून आपल्या लष्कराला हे विशेष अधिकार दिले जाणार असल्याची घोषणा चीनने केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर आक्षेप नोंदविला. या एकतर्फी निर्णयाचा भारताबरोबरील द्विपक्षीय करारांवर विपरित परिणाम होईल. चीनबरोबर सीमा नियोजन तसेच सीमेवर शांतता व सौहर्दा कायम राखण्याच्या दोन्ही देशांच्या प्रयत्नांशी हा निर्णय सुसंगत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. हा कायदा चीनच्या लष्कराला सीमेवरील प्रांतांच्या फेररचनेचा अधिकार देणारा आहे, याचीही भारताने नोंद घेतल्याचे बागची यांनी स्पष्ट केले. अजूनही चीनने भारताबरोबरील सीमावाद सोडविलेला नाही, हे लक्षात आणून देऊन चीनच्या कायद्यात असलेल्या या तरतुदीमुळे उभय देशांमधील तणाव अधिकच वाढू शकतो, असे संकेत अरिंदम बागची यांनी दिले.

या कायद्यानुसार कारवाई करण्याचे विघातक परिणाम चीन लक्षात घेईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असे सूचक उद्गार परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी काढले. भारताबरोबरील सीमेचा विचार केलाच तर चीनच्या या कायद्याला वैधता नाही, हे लक्षात येईल, असे बागची पुढे म्हणाले. दरम्यान, लडखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची १३ वी फेरी नुकतीच पार पडली. ही चर्चा अपयशी ठरली व यानंतर चीनने भारत आपल्याकडे अवाजवी मागण्या करीत असल्याची तक्रार केली होती. तर तणाव कमी करण्यासाठी भारतीय लष्कराने दिलेले प्रस्ताव चीनने नाकारल्याचा ठपका भारताने ठेवला होता.

चर्चेची ही १३ वी फेरी अपयशी ठरल्यानंतर चीनने एलएसीवरील आपल्या कारवाया तीव्र केल्या होत्या. लडाखच्या एलएसीवरून भारतीय लष्कराचे लक्ष अरुणाचल प्रदेशकडे वळविण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न करून पाहिला होता. इथे मोठ्या प्रमाणात तैनाती करून चीन भारतावरील दडपण वाढविण्याची तयारी करीत आहे. याची नोंद भारतीय लष्कराने घेतली असून याविरोधात आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याची ग्वाही भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिली आहे.

leave a reply