भारत- फिलिपाईन्समध्ये संरक्षण आणि सागरी सहकार्य दृढ होणार

नवी दिल्ली – भारत-फिलिपाईन्समध्ये संरक्षण आणि सागरी सहकार्य दृढ करण्यावर एकमत झाले आहे. संरक्षण साहित्याचा पुरवठा आणि लष्करी प्रशिक्षणावर दोन्ही देश विशेष भर देणार आहेत. साऊथ चायना सीमधील चीनच्या दाव्यावरून फिलिपाईन्सने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. साऊथ चायना सीमधील चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी नुकतीच फिलिपाईन्सने ‘आर्म्ड मिलिशिया’ बनविण्याची आणि चीनला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी फिलिपाईन्सने भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि फिलिपाईन्समधील हे संरक्षण सहकार्य लक्षवेधी ठरत आहे.

शुक्रवारी भारत आणि फिलिपाईन्सच्या जाँईंट कमिशनची व्हर्च्युअल बैठक पार पडली. भारताकडून या बैठकीचे नेतृत्व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि फिलिपाईन्सकडून परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव तेड्ररो लॉकसिन यांनी केले. यावेळी उभय देशांमध्ये संरक्षण आणि सागरी सहकार्यावर चर्चा पार पडली. तसेच दहशतवादविरोधी कारवाईच्या माहितीची देवाणघेवाण करण्यावर भारत आणि फिलिपाईन्सचे एकमत झाले. यावेळी भारत आणि फिलिपाईन्समध्ये व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. भारताच्या ‘इंडो- पॅसिफिक’ आणि ‘आसियन क्षेत्रातील धोरणानुसार भारत आणि फिलिपाईन्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरत असल्याचे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावेळी केले.

दरम्यान, भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले ‘ब्रम्होस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याला फिलिपाईन्सने उत्सुकता दाखविली आहे. ‘ब्रम्होस’साठी लवकरच भारत आणि फिलिपाईन्समध्ये करार होणार असल्याची चर्चा आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनचा तणाव वाढलेला असताना आणि ‘साऊथ चायना सी’ मध्ये चीनची दादागिरी वाढत असताना भारत आणि फिलिपाईन्समधले सहकार्य दृढ होत आहे. ही बाब लक्षवेधी ठरत आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही भारत आणि फिलिपाईन्समध्ये व्यापार आणि गुंतवणूकीसह विविध क्षेत्रातील सहकार्यावर दोन वेळा व्हर्च्युअल चर्चा पार पडली, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply