अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक तसेच सहाय्यकांना भारत आश्रय देण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – तालिबान अफगाणिस्तानचा ताबा घेणार हे निश्‍चित झाल्यानंतर, या देशात गदारोळ माजला आहे. विविध देश आपले दूतावास बंद करून आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलावून घेत आहेत. त्याचवेळी अमेरिकेसारख्या देशा आजवर सहाय्य पुरविणारे अफगाणी आपल्याला अमेरिकेने आश्रय द्यावा, यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत भारताने देखील अफगाणिस्तानातील आपल्या पाठिराख्यांना आश्रय देण्याची तयारी केली आहे. अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नसला, तरी सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या जात आहेत.

अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक तसेच सहाय्यकांना भारत आश्रय देण्याच्या तयारीतकाही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या शीख समुदायावर हल्ले झाले होते. तालिबान या देशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असताना, हिंदू व शीख समुदाय अधिकच असुरक्षित बनला आहे. याची गंभीर दखल भारताने घेतली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातील या धार्मिक अल्पसंख्यांची सुरक्षा सुनिश्‍चित केली जाईल, असे म्हटले होते. मात्र त्यांना भारतात आश्रय देण्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केलेली नाही. दरम्यान, पंजाबी संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांना देशात आश्रय देण्याची मागणी केली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर, भारत अफगाणिस्तानातील घडामोडींवर नजर ठेवून असल्याचे दिसत आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांबरोबरच, अफगाणिस्तानात भारतीयांच्या सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या आपल्या पाठिराख्यांनाही सुरक्षित आश्रय देण्यावर भारत विचार करीत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अमेरिकेसारखा देश आपल्याला सहाय्य पुरविणाऱ्या हजारोजणांना तालिबानच्या तावडीतून सोडविण्यासाठी उत्सुक नाही. त्या पार्श्‍वभूमीवर, भारत यासंदर्भात घेत असलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.

दरम्यान, अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांना तालिबानकडून धोका नाही, असा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला. तसेच अफगाणिस्तानातील भारताच्या दूतावासालाही तालिबानकडून धोका नसल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे.

leave a reply