अमेरिकेने निर्बंध मागे घेतल्यास भारत इराणकडून इंधन खरेदी करण्यास तयार

नवी दिल्ली – अमेरिकेने इराणच्या इंधन निर्यातीवरील निर्बंध मागे घेतल्यानंतर, भारत इराणकडून इंधनाची आयात सुरू करील, असे भारताच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हटले आहे. इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमावरून अमेरिका व इराणची अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी आपला देश इराणवरील काही निर्बंध मागे घेण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी इंधनाच्या दरावरून भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध काहिसे ताणले गेले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर इराणकडून इंधनाचा पुरवठा सुरू झाला तर इंधनाचे दर खाली येतील, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

Advertisement

इंधन तेलासाठी सौदी अरेबियावरील अवलंबित्त्व कमी करून इतर पर्यायांचा शोध घ्या, असे आदेश भारत सरकारने राष्ट्रीय इंधन कंपन्यांना दिले होते. इंधनाच्या दरावरून सौदीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे भारताने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. कोरोनाची साथ असताना, लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले होते आणि त्यामुळे इंधनाची मागणी घसरली होती. त्यामुळे इंधनाची उत्पादनही कमी झाले होते. पण आता इंधनाची मागणी वाढली असून इंधन उत्पादक देशांनी उत्पादन वाढवावे व इंधनाचे वाढलेले दर नियंत्रित करावे, असे आवाहन भारताने केले होते. पण सौदीने ते मानण्यास नकार दिला. त्याऐवजी भारताने दर कमी असताना खरेदी केलेले स्वस्त इंधन वापरावे, असा अनाहूत सल्ला सौदीच्या इंधनमंत्र्यांनी दिला होता.

यानंतर भारताने आफ्रिका तसेच इतर देशांकडून इंधनाची खरेदी वाढवून सौदीकडील इंधनाच्या खरेदीत कपात केली होती. ही कपात ३३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेतले तर ती भारतासाठी फार मोठी लाभदायी बाब ठरेल. २०१९ सालच्या मे महिन्यात अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला इराणकडून इंधनाची खरेदी करणे अवघड होऊन बसले होते. त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला होता. कारण इराणकडू इंधनाची सार्वाधिक खरेदी करणार्‍या देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर होता. पण आता हे संबंध पूर्वपदावर येऊ लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

२०२०-२१ या वित्तीय वर्षात भारताला इंधनाचा सर्वाधिक पुरवठा करणार्‍या देशांमध्ये इराक पहिल्या क्रमांकावर आणि सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर होते. नायजेरिया हा भारताला इंधन पुरवणार्‍या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर तर अमेरिका पाचव्या क्रमांकावर होती.

leave a reply