संरक्षणदलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत व्हिएतनामला सहाय्य करणार

आधुनिकीकरणनवी दिल्ली – व्हिएतनामच्या संरक्षणदलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत संपूर्ण सहाय्य करील, अशी ग्वाही भारताकडून देण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल गो शुआन लिआ यांच्यामध्ये नुकतीच व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा झाली. यावेळी भारत-व्हिएतनाममधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

गेल्या चार महिन्यातील भारत आणि व्हिएतनामची संरक्षण, वाणिज्य आणि परराष्ट्रमंत्रालयाच्या पातळीवर अशाप्रकरची झालेली ही तिसरी बैठक आहे. तसेच १० डिसेबरला आसियन देशांच्या संरक्षणमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक व्हिएतनामच्या अध्यक्षतेखाली होणार असून यासाठी भारताला व्हिएतनामने आमंत्रित केले आहे. यावेळीही दोन्ही देशांमध्ये चर्चा पार पडेल. भारत आणि व्हिएतनाममधील हे वाढते सहकार्य चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लक्षवेधी ठरत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आकाश ही हवाई सुरक्षा यंत्रणा आणि ध्रुव हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यास उत्सुक आहे. तसेच भारतीय बनावटीची हलक्या वजनाची तेजस या बहुउद्देशीय विमानाची खरेदी करण्यासाठीही व्हिएतनाम उत्सुकता दाखवत आहे. भारताप्रमाणे व्हिएतनामचेही चीनबरोबर वाद असून चीनकडून व्हिएतनामच्या सागरी सीमेवर दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकत्याच झालेल्या या बैठकीतही या संरक्षण सहकार्यावर चर्चा झाल्याचे दावे केले जातात.

दोन्ही देशांमधील संयुक्त संरक्षण प्रकल्पांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. दोन्ही देशांमध्ये युद्धनौका आणि पाणुबड्यांच्या उभारणीसंदर्भातही सहकार्य सुरू आहे. यावरही चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. यावेळी भारत आणि व्हिएतनामने हाईड्रोग्राफिक करारावरही स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यानुसार दोन्ही देश आपल्या समुद्री क्षेत्रातील हाईड्रोग्राफिक डाटाबद्दल वेळोवेळी एकमेकांना माहिती पुरवितील. याचा उपयोग जलवाहतुकीसाठी, पाणबुड्यांच्या ऑपरेशन्ससाठी हा डाटा उपयोगी पडेल. या पार्श्‍वभूमीवर या कराराचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान तीन आठवड्यांपूर्वीच भारत आणि आसियन देशांमध्ये व्हर्च्युअल समिट पार पडली होती. यावेळी पंतप्रधान नरेंेद्र मोदी यांनी भारत आणि आसियन देशांच्या इंडो पॅसिफीक धोरणामध्ये समानता असून त्यामुळे आसियन हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा मूळ आधार ठरतो, असे अधोरेखित केले होते. या पार्श्‍वभूमीवर भारत व्हिएतनामसह सर्वच आसियन देशांबरोबर सहकार्य अधिक भक्कम करीत असल्याचे दिसत आहे

leave a reply