भारतीय लष्कराचा पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला

- ‘पीन पॉईंट स्ट्राईक’ केल्याचा सूत्रांचा दावा

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले चढविले आहेत. याचे तपशील समोर आलेले नसले तरी, गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने चढविलेल्या या हल्ल्यात दहशतवादी तळांचे फार मोठे नुकसान झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा हल्ला नक्की कधी झाला, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. भारत आपल्यावर हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा करण्याची नवी संधी मिळू नये, याकरीता भारतीय लष्कर या आघाडीवर सावधानता बाळगताना दिसत आहे.

दहशतवादी तळांवर हल्ला

गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानने काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवरील गोळीबार तसेच तोफांचा मारा तीव्र केला होता. कडक हिवाळा सुरू होण्याच्या आधी शक्य तितक्या प्रमाणात दहशतवादी जम्मू-काश्‍मीरमध्ये घुसविण्याचे कारस्थान त्यामागे होते. तसेच आपल्या विरोधात व भारताच्या बाजूने खडे ठाकलेल्या नियंत्रण रेषेवरील जनतेला धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत आहे. गेल्या शुक्रवारी पाकिस्तानने उत्तर काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले तर चार नागरिकांचा बळी गेला होता.

भारतीय लष्कराने प्रतिहल्ला चढवून पाकिस्तानच्या 11 जवानांना ठार केले होते. त्यानंतरच्या काळातही पाकिस्तानी लष्कराकडून भारताला चिथावणी देणारा गोळीबार व तोफांचा मारा सुरू होता. नियंत्रण रेषेवर हा संघर्ष सुरू असताना पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये लष्करधार्जिणे पत्रकार व विश्‍लेषक भारताला धडा शिकविण्याची मागणी करीत आहेत. भारतात, विशेषतः जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडविल्याखेरीज आंतरराष्ट्रीय समुदायाचे काश्‍मीरकडे लक्ष जाणार नाही, असे या भारतद्वेष्ट्या पाकिस्तानी पत्रकारांचे व विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवरील गोळीबार तसेच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न अधिकच तीव्र केल्याचे दिसू लागले होते.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सतर्कता दाखवून पाकिस्तानची कारस्थाने हाणून पाडली होती. तरीही पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवरून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच होते. त्यामुळे भारतीय लष्कराने गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पीओकेमधील दहशतवाद्यांच्या या तळांवर ‘पीन पॉर्इंट स्ट्राईक’ अर्थात अचूक हल्ले चढविले. यात भारताचे विशेष नुकसान झाले नाही. पण या हल्ल्यांमुळे दहशतवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताने आपल्या धोरणात आक्रमक बदल केले आहेत. यानुसार जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांना टिपून ठार केले जात असून दहशतवाद्यांची पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठीही आक्रमक लष्करी धोरण राबविण्यात येत आहे. भारतीय लष्कर नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांवर कारवाई करील, असा इशारा भारताच्या लष्कराने याआधी पाकिस्तानला दिला होता. त्यानुसार ‘पीओके’मधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले चढवून भारतीय लष्कर आपला इशारा प्रत्यक्षात उतरवित असल्याचे दिसत आहे. मात्र या कारवाईचा वापर करून पाकिस्तान भारताने आपल्यावर हल्ला चढविला, असा कांगावा करू शकणार नाही, याचीही दक्षता भारताकडून घेतली जात असल्याचे दिसते.

पीओकेमधील दहशतवाद्यांच्या तळांवर लष्कराने हल्ले चढविल्याच्या बातम्या आल्यानंतर भारतीय लष्कराने त्यावर सावध प्रतिक्रिया दिली. आजच्या दिवशी नियंत्रण रेषेवर अशी कारवाई करण्यात आलेली नाही, असा खुलासा लष्कराने केला आहे. पण या दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतात शिरकाव करू पाहणारा एकही दहशतवादी परत जाऊ शकणार नाही, असा खणखणीत इशारा दिला. जम्मू काश्‍मीरच्या नागरोटा येथे भारतीय लष्कराने चार दहशतवादी ठार केल्यानंतर, लष्करप्रमुखांनी दिलेला हा इशारा औचित्यपूर्ण ठरत आहे.

leave a reply