भारतीय लष्कराने लडाखच्या सीमेवरील पकड अधिक भक्कम केली

नवी दिल्ली – २९-३० ऑगस्टच्या रात्री व त्यानंतर दोन आठवड्याच्या काळात भारतीय सैनिकांनी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील भागात केलेल्या कारवाईची माहिती हळुहळू समोर येऊ लागली आहे. या कालावधीत भारतीय सैन्याने मगर हिल, गुरुंग हिल, रेचेन ला, रेजांग ला, मुखपरी आणि फिंगर ४ जवळील शिखरांचाही ताबा घेतल्याच्या बातम्या आहेत. ही पर्वतराजी भारताच्या हद्दीत येत असली तरी त्यावर भारतीय सैन्याच्या चौक्या नव्हत्या. म्हणूनच चीन ही मोक्याची शिखरे ताब्यात घेण्याच्या तयारीत होता. त्याच्याआधीच भारतीय सैन्याने या टेकड्यांवर नियंत्रण मिळवून इथे गस्त सुरू केली. यामुळे चीनचा कट उधळला गेला आहे. यामुळे अस्वस्थ झालेला चीन भारताकडे सैन्यमाघारीची मागणी करीत आहे. सोमवारी दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या ब्रिगेडिअर स्तरावरील चर्चेतही चीन ही मागणी उचलून धरण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय लष्कर

भारतीय सैन्याने या सहाही शिखरांवर ताबा घेतल्यानंतर सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी चीनने लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. रेचेन ला आणि रेजांग ला या शिखरांच्या जवळ चीनने तीन हजार जवान तैनात केले आहेत. त्याचबरोबर भारतीय सैनिकांना धमकावण्यासाठी चिनी जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनार्‍यावरून तीन वेळा हवेत गोळीबार करुन चिथावणीही दिली होती. चिनी जवानांनी किमान १०० ते २०० राऊंड्स झाडल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. या व्यतिरिक्त १५ ते २५ चिनी सैनिक हातात संगीन असलेल्या बंदूका, लोखंडी हत्यारे घेऊन पुन्हा गलवान’ घडविण्याच्या इराद्याने आल्याचे फोटोग्राफ्सही जगासमोर आले होते. पण भारतीय सैनिकांनीही हवेत गोळीबार करुन चिनी जवानांना निर्णायक इशारा दिल्यानंतर चिनी जवानांना माघार घ्यावी लागली.

भारतीय सैनिकांना या भागात आघाडी मिळाल्यानंतर चीनच्या हद्दीतील मॉल्डो गॅरिसनमध्ये चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या असून चीनने अतिरिक्त सैन्यतैनाती केली आहे. याच मॉल्डो गॅरिसन अथवा भारताच्या हद्दीतील चुशूल येथे सोमवारी उभय देशांच्या ब्रिगेडिअर स्तरावरील अधिकार्‍यांमध्ये चर्चा होत आहे. सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली होती.

आतापर्यंत चीनचे लष्कर भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन चिथावणीखोर कारवाया करीत आल्या आहेत. भारतीय सैन्य आतापर्यंत चीनला रोखण्याचेच काम करीत होते, पण गलवानच्या संघर्षानंतर भारताला आपली चीनबाबतची पारंपारिक भूमिका बदलावीच लागेल, अन्यथा चीन भारताच्या संयमाचा गैरफायदा उचलत राहील, असा इशारा माजी लष्करी अधिकारी, सामरिक विश्लेषक देत आहेत. १९६२ सालीही चीनचे हेतू ओळखण्यात भारताने मोठी चूक केली होती. आत्ताही चीनची भूमिका बदललेली नाही, असे विश्लेषक बजावत आहेत. भारतीय लष्करानेही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक कारवायांची सरकारकडे अनुमती मागितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढच्या काळात भारतीय सैन्य चीनच्या लष्कराला केवळ थोपविण्याचे काम करणार नाही, तर चीनवर दडपण वाढविणार्‍या लष्करी हालचाली करील, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply