भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायली राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांशी चर्चा

जेरूसलेम – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोेग यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील सहकार्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यावर तसेच भू-राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर इस्रायली नेतृत्त्वाशी चर्चा पार पडल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. इस्रायली पंतप्रधानांनी भारताबरोबरील संबंधांबाबत दाखविलेली धोरणात्मक दृष्टी बहुमोलाची असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायली राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांशी चर्चापरराष्ट्रमंत्री जयशंकर पाच दिवसांच्या इस्रायल दौर्‍यावर आहेत. आखाती क्षेत्रात फार मोठ्या उलथापालथी होत असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही इस्रायल भेट लक्षणीय ठरते. याचे सारे तपशील अद्याप उघड झालेले नसले तरी जयशंकर यांच्या या दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा आणि करार अपेक्षित असल्याचा दावा केला जातो. इस्रायल हा भारताला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा करणारा महत्त्वाचा देश आहे. तसेच कट्टरवाद व दहशतवादापासून भारत व इस्रायलला एकसमान धोका संभवतो, असे भारताचे म्हणणे असून याविरोधात दोन्ही देश परस्परांना सहाय्य करीत असल्याचेही उघड झाले होते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या या भेटीत तशी घोषणाही केली होती.

भारत व इस्रायलचे द्विपक्षीय सहकार्य वेगळ्याच वळणावर आले असून आत्तापर्यंत याचा दोन्ही देशांना लाभ मिळालेला आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. यामुळे दोन्ही देशांसमोर नव्या शक्यता समोर आल्या आहेत. या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याचे आव्हान स्वीकारून दोन्ही देशांना आपले द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे जयशंकर पुढे म्हणाले. इस्रायलबरोबर उत्तम सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी भारतीय जनमानस फार मोठी उत्सुकता दाखवित आहे, याकडेही जयशंकर यांनी लक्ष वेधले.

‘इस्रायलींचे भारतावर अतिशय प्रेम आहे व आम्ही भारताकडे विशाल मित्रदेश म्हणून पाहतो. भारताबरोबर सर्वच क्षेत्र आणि आघाड्यांवर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल उत्सुक आहे’, असे पंतप्रधान बेनेट यांनी जयशंकर यांच्याबरोबरील चर्चेत म्हटले आहे. तर इस्रायली राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या इस्रायल दौर्‍याचे स्वागत केले. प्राचीन वारसा लाभलेले दोन लोकशाहीवादी देश, अशा शब्दात भारत व इस्रायलचा उल्लेख करून राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी व्यापार, तंत्रज्ञान व ऊर्जा या क्षेत्रात दोन्ही देश बरेच काही साध्य करू शकतात, असा विश्‍वास व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली पंतप्रधान बेनेट यांना भारतभेटीचे आमंत्रण दिल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली.

leave a reply