भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील धोक्यांसाठी सज्ज रहावे

- व्हाईस अ‍ॅडमिरल अतुल कुमार जैन

नवी दिल्ली – भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील धोक्यांसाठी सज्ज रहावे, असे आवाहन ‘ईस्टर्न नेव्हल कमांड’चे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अ‍ॅडमिरल अतुल कुमार जैन यांनी केले. गेली काही वर्षे हिंदी महासागर क्षेत्रात सुरु असलेल्या चीनच्या आक्रमक लष्करी हालचाली व गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, व्हाईस अ‍ॅडमिरल जैन यांचे विधान महत्वपूर्ण ठरते. ७४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, व्हाईस अ‍ॅडमिरल जैन यांनी कोरोना साथीच्या काळात नौदलाने बजावलेल्या कामगिरीची प्रशंसाही केली.

भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील धोक्यांसाठी सज्ज रहावे‘कोरोनाव्हायरसची साथ व सुरक्षेच्या मुद्यावर असलेला तणाव यामुळे देशाला आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे. सामरिक पातळीवरील समीकरणे बदलत असून, अशा स्थितीत हिंदी महासागराची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते.या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता ईस्टर्न नेव्हल कमांडने पारंपारिक व अपारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे’, असे आवाहन व्हाईस अ‍ॅडमिरल अतुल कुमार जैन यांनी यावेळी केले.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे वेगवेगळ्या देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ राबविले होते. समुद्र सेतू अंतर्गत साडेतीन हजारांहून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. व्हाईस अ‍ॅडमिरल जैन यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या नौदलाच्या जवानांचे अभिनंदन केले.

भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील धोक्यांसाठी सज्ज रहावेगेल्या काही वर्षात चीनच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्या आहेत. चीनची विस्तारवादी भूमिका लपून राहिलेली नाही. हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. या क्षेत्रातील चीनच्या पाणबुड्यांच्या वावरदेखील वाढला आहे. एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असताना या संकटाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) हिंदी महासागर क्षेत्रात नौदल तळ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या या हालचाली सदर क्षेत्रातील शांती व स्थैर्य प्रभावित करतील, असा इशाराही लष्करी विश्लेषकांनी नुकताच दिला होता.

चीनच्या या कारवाया रोखण्यासाठी भारताने आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील संघर्षानंतर चीनबरॊबर तणावात वाढ झाल्यानंतर भारताने हिंदी महासागर क्षेत्रातील आपली तैनाती वाढवण्यास सुरुवात केली आहे. नौदलाने मलाक्काच्या सामुद्रीधुनीजवळ आपल्या प्रमुख युद्धनौका तैनात केल्या होत्या. मलाक्काच्या सामुद्रधुनीतून चालणाऱ्या चीनच्या व्यापाराभोवतीचा फास भारत कधीही आवळू शकतो आणि चीनला कोंडीत पकडू शकतो, याची जाणीव यातून चीनला करून देण्यात आली आहे. त्याचवेळी या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या “क्वाड”मध्ये लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.

leave a reply