इंधनाच्या वाढत्या किंमतीबाबत भारताच्या पेट्रोलियममंत्र्यांची सौदी, युएईच्या मंत्र्यांबरोबर चर्चा

नवी दिल्ली – इंधन तेलाच्या किंमतीत सातत्याने होणार्‍या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पेट्रोलियममंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ओपेकमधील प्रमुख देशांबरोबर चर्चा सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोलियमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) उद्योगमंत्र्यांबरोबर यासंदर्भात चर्चा केली होती. तर गुरुवारी सध्याकाळी सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांशीही पेट्रोलियमंत्र्यांनी फोनवरून संवाद साधला. शनिवारी कतारच्या ऊर्जामंत्र्यांशी केंद्रीयमंत्री हरदिप सिंग पुरी यांनी चर्चा केली होती.

इंधनाच्या वाढत्या किंमतीबाबत भारताच्या पेट्रोलियममंत्र्यांची सौदी, युएईच्या मंत्र्यांबरोबर चर्चाशुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 73.67 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत वाढत असलेल्या इंधन किंमतीमुळे भारतीय स्थानिक बाजारातही इंधन किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. 2020-21 सालात देशात पेट्रोलच्या किंमती 20 रुपयांनी, तर डिझेलच्या किंमती 18.5 रुपयांनी वाढल्या. अनुक्रमे 30 आणि 29 टक्के इतकी अनुक्रमे वाढ पेट्रोलच्या किंमतीत नोंदविण्यात आली. चालू आर्थिक वर्षातही इंधनाच्या किंमतीतील वाढ थांबलेली नाही. पेट्रोलच्या किंमती 100च्या, तर डिझेलच्या किंमतीही 95 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत.

भारत हा इंधनाचा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन ग्राहक देश आहे. भारताने ओपेक देशांना इंधनाच्या किंमती कमी करण्याची वारंवार मागणी केली आहे. ग्राहक देशांचे हित लक्षात घेऊन इंधन उत्पादन वाढवावे व किंमती कमी कराव्या अशी भारताची मागणी आहे. ओपेक देशांनी तसे केले नाही, तर भारताला इतर पर्याय तपासावे लागतील, असा इशाराही भारताने काही महिन्यापूर्वी दिला होता. ओपेक देशांनी कोरोना काळात इंधन उत्पादन कमी केले होते. मात्र या साथीची तीव्रता कमी झाल्यावर वाढलेल्या मागणीनुसार इंधन पुरवठा वाढविण्याचे याआधी ओपेक देशांनी मान्य करून सुद्धा या देशांनी तसे केले नाही. त्यामुळे इंधनाच्या किंमती सतत वाढत आहेत. डिसेंबर महिन्यात 50 डॉलर प्रति बॅरल असलेले इंधनाचे दर आता 73 डॉलर्सच्या पुढे गेले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पेट्रोलियम मंत्रालयाची सूत्रे हाती घेतलेल्या केंद्रीयमंत्री हरदिप सिंग पुरी यांनी इंधन डिप्लोमसी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. सौदी अरेबिया, युएई देशांबरोबर करण्यात आलेली चर्चा याचाच भाग ठरत असल्याचे तज्ज्ञांचे दावे आहेत. केंद्रीयमंत्री हरदिप सिंग पुर यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अझिज बिन सलमान अल सौद यांच्याबरोबरील चर्चेत इंधनाच्या किंमतीबाबत भारताला वाटत असलेल्या चिंता स्पष्ट व्यक्त केल्या.

ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक भक्कम करण्यावर यावेळी जोर देण्यात आला. भारताच्या ऊर्जा विषयक गरजा वेगाने वाढत आहेत. दोन्ही देशांमध्ये ग्राहक व विक्रेता या पलिकडे असलेली ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागिदारीमध्ये अधिक विविधता आणण्यासाठी सौदीच्या ऊर्जामंत्र्यांबरोबर काम करण्याची इच्छा यावेळी हरदिप सिंग पुरी यांनी व्यक्त केली. याआधी हरदिप सिंग पुरी यांनी 14 जुलै रोजी युएईचे उद्योगमंत्री सुलतान अहमद अल जाबेर यांच्याशी चर्चा केली होती.

leave a reply