अफगाणिस्तानातील भारतीयांचे अपहरण झालेले नाही

- तालिबानच्या स्पष्टीकरणानंतर भारतीयांची चिंता दूर झाली

भारतीयांचे अपहरणनवी दिल्ली – मायदेशी परतण्यासाठी काबुलच्या विमानतळावर निघालेल्या भारतीयांचे तालिबानने अपहरण केल्याची बातमी शनिवारी सकाळच्या सुमारास आली होती. यामुळे देशवासियांच्या चिंता वाढत असतानाच, हे भारतीय सुखरूप असल्याचे वृत्त आले. तालिबानने देखील अपगाणिस्तानातील भारतीयांचे अपहरण झालेले नाही, असे जाहीर करून टाकले. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती व इथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याबाबत जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांच्याशी चर्चा केली.

काबुलच्या विमानतळावर निघालेल्या भारतीयांना तालिबानने रोखले व त्यांचे अपहरण केले, अशी माहिती अफगाणी पत्रकारांनी सोशल मीडियावर दिली होती. शनिवारी सकाळी यामुळे भारतात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र काही काळातच हे सारे भारतीय सुखरूप असल्याचे उघड झाले. तालिबानने या भारतीयांना काबुलमधील विमानतळावर पोहोचेपर्यंत सुरक्षा पुरविली होती. इतकेच नाही तर त्यांना लंच देण्याचीही तयारी दाखविली, असे समोर आले आहे. तसेच तालिबानने भारतीयांचे अपहरण झालेले नाही, अशी त्वरित घोषणा केली होती. लवकरच हे भारतीय मायदेशी परततील, असे सांगितले जाते. पण या भारतीयांबरोबरच अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीख समुदायाच्या मंडळींना तालिबानने काबुल विमानतळावरूनच परत पाठविले.

तुम्ही अफगाणी असल्याने देश सोडून जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगून तालिबानने अफगाणिस्तानातील या धार्मिक अल्पसंख्यांकांना परत पाठविले. तालिबानच्या राजवटीपासून धोका निर्माण झाल्याने अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांको हा देश सोडून जाण्याची तयारी करीत आहेत. पण आपला उदार चेहरा जगाला दाखविण्यासाठी तालिबान या धार्मिक अल्पसंख्यांकांचा वापर करीत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. याआधी तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांंकांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना, विविध देश या मुद्यावर एकमेकांशी चर्चा करीत आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांच्याशी अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर चर्चा केली. फोनवरून पार पडलेल्या या चर्चेत अफगाणिस्तानात अडकलेल्यांना बाहेर काढण्याच्या आव्हानाचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच तालिबानची राजवट येत असताना, या देशाच्या धोरणात होत असलेला बदल हा देखील सदर चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले जाते.

याआधी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका व ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर अफगाणिस्तानबाबत चर्चा केली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा केली होती.

leave a reply