एप्रिल-जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली

नवी दिल्ली – कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा जबरदस्त फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत भारताचा जीडीपी तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. पुढील दोन तिमाहींमध्येही आर्थिक घसरण कायम राहण्याचे संकेत अर्थतज्ञ व विश्लेषकांनी दिले असून, त्यामुळे यावर्षी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नसल्याचे मानले जात आहे.

भारताची अर्थव्यवस्था

सोमवारी ‘नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस’ने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची कामगिरी जाहीर केली. त्यानुसार कृषी क्षेत्र वगळता जीडीपीचा मुख्य हिस्सा असणाऱ्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कृषी क्षेत्राने ३.४ टक्के वाढीचा दर नोंदवून दिलासा दिला. उत्पादन क्षेत्रात ३९.३, बांधकाम क्षेत्रात ५०.३ तर व्यापार क्षेत्रात तब्बल ४७ टक्क्यांची घसरण झाली आहे. याच कालावधीत सरकारी खर्चही १०.३ टक्क्यांनी कमी झाला आहे.

भारताने १९९६ सालापासून आर्थिक वर्षातील तिमाहीची कामगिरी जाहीर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आत्तापर्यंतच्या कालावधीत झालेली ही सर्वात मोठी व ऐतिहासिक घसरण मानली जात आहे. जगातील आघाडीच्या २० देशांचा समूह असणाऱ्या ‘जी-२०’ गटातील देशांमध्ये ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर भारत सरकारने २५ मार्चला संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा लॉकडाऊन कायम होता. जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी जनजीवन अद्यापही पूर्णपणे सामान्य झालेले नाही. पर्यटन, शिक्षण, प्रवासी वाहतूक, रेल्वे, हॉटेल व मनोरंजन क्षेत्रातील बहुतांश व्यवहार ठप्प असून अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे येत्या काही महिन्यात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता नसल्याचा दावा अर्थतज्ञ व विश्लेषकांनी केला आहे.

leave a reply