भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची चीनला सणसणीत चपराक

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि याबाबत बोलण्याचा चीनला अधिकार नाही, अशा खणखणीत शब्दात भारताने चीनला खडसावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताची भूमिका नेमक्या शब्दात मांडली. चीन लडाखला भारताचा भूभाग मानत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच म्हटले होते. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही प्रतिक्रिया आली आहे.

परराष्ट्र

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते चीन लगतच्या सीमाभागातील सुमारे ४४ रस्ते व पुलांचे उद्‍घाटन एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे करण्यात आले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने भारत सीमाभागात करीत असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, हेच दोन्ही देशांमधील तणावाचे मूळ कारण असल्याचा दावा केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हा दावा करीत असताना आपला देश लडाखला भारताचा भूभाग मानत नसल्याचे दावे ठोकले होते.

लडाखबरोबरच अरुणाचल प्रदेश देखील भारताचा भूभाग नाही, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते. यावर भारतीय माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही चीनला या चिथावणीखोर विधानावर कडक शब्दात समज दिली, असे दिसत आहे.

परराष्ट्र

भारत दुसर्‍या कुठल्याही देशाच्या अंतर्गत कारभारावर शेरेबाजी करीत नाही आणि इतर देशांकडूनही भारताची तशीच अपेक्षा असते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला बजावले. जम्मू-काश्मीरसह लडाख हा भारताचा भूभाग होता, आहे आणि यापुढेही राहील, असे श्रीवास्तव यांनी ठासून सांगितले. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशबाबत देखील कुठल्याही प्रकारचा वाद संभवत नाही, हा देखील भारताचा अविभाज्य भागच आहे, असे अनुराग श्रीवास्तव यांनी ठणकावले.

पुढच्या काळात चीन भारताला चिथावणी देणारी विधाने करणार असेल, तर भारताकडेही चीनला कोंडीत पकडण्यासाठी बरेच मुद्दे आहेत, याची जाणीव भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला करून दिली आहे. विशेषतः तैवान आणि तिबेट हे चीनसाठी अतिशय संवेदनशील असणारे मुद्दे भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करू शकतो, याची वेगवेगळ्या मार्गाने चीनला जाणीव करून दिली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने चीनला थेट शब्दात फटकारले, याचे काही पत्रकारांनी स्वागत केले आहे. लष्करी तसेच आर्थिक पातळीवर भारत चीनला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. पण आता राजनैतिक पातळीवरही चीनला त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे, याची जाणीव भारताला झाली ही अत्यंत स्वागतार्ह बाब ठरते, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

leave a reply