पाकिस्तानी दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी भारताच्या राजनैतिक हालचाली

नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांनी नागरोटा येथे चार दहशतवाद्यांना ठार करून उधळलेल्या भयंकर कटाची माहिती, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यदेशांना दिली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानात केंद्र असलेल्या दहशतवादी संघटनाने 26/11च्या धर्तीवर भयंकर घातपाताचे कारस्थान आखले होते. याची गंभीर दखल घेऊन प्रमुख देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवरील दडपण वाढवावे, असे आवाहन यावेळी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केले.

26/11 च्या स्मरणदिनी भयंकर घातपात घडविण्याचा कट ‘जैश’ने आखला होता. याला पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे पूर्णपणे सहाय्य असल्याची बाबही समोर आली आहे. 19 नोव्हेंबर रोजी जम्मू नगरोटा येथे दहशतवाद्यांना रोखून त्यांना संपविण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले. त्यामुळे अनर्थ टळला. या दहशतवाद्यांकडे 11 ‘एके-47 रायफल्स’ तसेच 29 ग्रेनेडस्‌’ यांच्यासह पाकिस्तानात तयार करण्यात आलेले साहित्य मिळाले होते. पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचा वापर करून भारत अस्थीर करू पाहत आहे, याचा धडधडीत पुरावा यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.

सध्या ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्ये असलेला पाकिस्तान या यादीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी हफीज सईद सारख्या दहशतवाद्याला अवघ्या दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावून पाकिस्तान आपल्या धोरणात बदल झाल्याचे चित्र उभे करीत आहे. त्याचवेळी पाकिस्तान छुप्यारितीने दहशतवाद्यांना आवश्‍यक ते सहाय्य करून भारतात घातपात माजवित असल्याचे पुरावे नागरोटा येथील चकमकीमुळे समोर आले आहे. या कटातील पाकिस्तानच्या सहभागाची सारी माहिती परराष्ट्र सचिव श्रृंगला यांनी प्रमुख देशांच्या राजदूतांसमोर मांडली.

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधून खणलेल्या भुयारांचा वापर करून हे दहशतवादी जम्मू व काश्‍मीरमध्ये शिरकाव करतात. पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्याखेरीज हे शक्यच नाही. नागरोटा येथी ठार झालेल्या ‘जैश’च्या दहशतवाद्यांना फार मोठा घातपात माजवायचा होता. याआधी 2019 साली ‘जैश’ने पुलवामा येथे चढविलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते, याचीही आठवण श्रृंगला यांनी करून दिली.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करण्यासाठी ‘पी5’ देशांच्या प्रतिनिधींना दिलेली ही माहिती म्हणजे भारताच्या पाकिस्तानविरोधातील आक्रमक राजनैतिक मोहिमेचा भाग ठरतो. नागरोटा येथील चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा घातपात उधळण्यात यश मिळालेल्या सुरक्षा दलांची प्रशंसा केली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन करून हा कट भारतने अत्यंत गांभीर्याने घेतल्याचा संदेश दिला होता. यामुळे पाकिस्तानात चलबिचल सुरू झाली आहे.

भारत लवकरच पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई करू शकतो, असा इशारा पाकिस्तानचे विश्‍लेषक देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे कुठलाही देश भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानची बाजू घेणार नाही, असेही पाकिस्तानचे विश्‍लेषक सांगत आहेत. अगदी चीन देखील भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानची बाजू घेण्याची शक्यता नाही, याचीही जाणीव या विश्‍लेषकांनी आपल्या सरकार व लष्कराला करून दिली आहे. काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर भारत अतिशय आक्रमक कारवाई करीत आहे आणि ही पाकिस्तानवरील पुढच्या लष्करी हल्ल्यासाठी आवश्‍यक असलेली वातावरणनिर्मिती असल्याचा इशाराही या विश्‍लेषकांनी दिला आहे. तर पाकिस्तानी लष्करच काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करून दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी सहाय्य करीत असल्याचा आरोप भारताकडून केला जात आहे.

leave a reply