‘एलओसी’वरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

जम्मू – पाकिस्तानच्या लष्कराने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) पुंछ जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून गोळीबार करुन संघर्षबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या या गोळीबाराला तितकेच जोरदार प्रत्युतर दिले. भारतीय सैनिकांच्या या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला जातो.

पाकिस्तानच्या गोळीबाराला

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंदर आनंद यांनी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती दिली. रविवारी पहाटे ३.२० मिनिटांनी पाकिस्तानच्या लष्कराने मॉर्टरचे हल्ले आणि गोळीबार केले. सकाळी सुमारे साडे पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी लष्कराकडून हे हल्ले सुरूच होते. पुंछ जिल्ह्यातील मानकोट भागात हे हल्ले चढविण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. भारतीय लष्कराने स्थानिकांना सुरक्षित बंकर्समध्ये हलविल्यामुळे जीवितहानी टळली. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या या चिथावणीला कडक प्रत्युत्तर दिल्याचे कर्नल आनंद यांनी सांगितले.

भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला जीवितहानी सोसावी लागल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानी लष्कराचा कॅप्टन पदावरील अधिकार्‍यासह दोन जण या कारवाईत ठार झाल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षाचौक्या देखील भारताच्या कारवाईत उद्‍ध्वस्त झाल्याचे बोलले जाते. पण पाकिस्तानी लष्कराने सीमेवरील संघर्षाबाबत माहिती प्रसिद्ध करण्याचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे आपले लष्कर सीमेवरील संघर्षाबाबत लपवाछपवी करीत असल्याची नाराजी पाकिस्तानच्या सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी देखील भारतीय सैनिकांच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे किमान २० जवान ठार झाल्याची दावे समोर आले होते.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि नौगाव आणि कुपवाडा भागात केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे तीन सैनिक शहीद झाले होते तर पाच जण जखमी झाले होते. कृष्णा घाटीवरील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सुरक्षा चौक्यांवर तोफांचे हल्ले चढविल्याचे दावे करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने देखील सीमेवर तोफा तैनात करण्याच्या हालचाली वाढविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी कराची बंदरावरील गस्त वाढविली होती.

leave a reply