काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

जम्मू – मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि मॉर्टर्सचे हल्ले चढवून पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा संघर्षबंदीचे उल्लंघन केले. काश्मीरच्या पुंछ आणि राजौरी भागात पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. पाकिस्तानी लष्कराच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे लष्कराने जाहीर केले. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासात भारतीय सुरक्षादलांनी पुलवामा आणि अनंतनाग भागातून दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन काश्मीरमध्ये घातपात घडविण्याचा पाकिस्तानचा आणखी एक डाव उधळून लावला.

चोख प्रत्युत्तर

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्हातील मानकोट सेक्टर या भागात मॉर्टर्सचे हल्ले चढविले असून यामध्ये येथील रहिवाशी भागाचे नुकसान झाले. आधीच नियंत्रण रेषेजवळील गावांना रिकामे केल्यामुळे जीवितहानी टळल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी व राजौरी भागात गोळीबार करुन पुन्हा एकदा संघर्षबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराने मानकोट सेक्टर, कृष्णा घाटी आणि राजौरीमध्ये केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराने भारताच्या नियंत्रण रेषेवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. या महिन्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराने ४५ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईला भारतीय सैनिकांकडून प्रत्युत्तर दिले जात असून आत्तापर्यंतच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील निलम व्हॅलीच्या भागातही पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांच्या ठिकाणांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पण पाकिस्तानी लष्कर याबाबत अधिक माहिती जाहीर करण्यास तयार नाही.

नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याबरोबर भारतीय सुरक्षादलांनी काश्मीरच्या खोर्‍यातही कारवाई सुरू केली आहे. सोमवारी लष्कर, निमल्ष्करी दल आणि पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत ‘लश्‍कर-ए-तोयबा’चा दहशतवादी फैझल अहमद दार याला अटक केली. दोन आठवड्यांपूर्वीच फैझल याने ‘लश्‍कर’मध्ये प्रवेश केल्याची माहिती सुरक्षादलांनी दिली. तर अनंतनाग जिल्ह्यातही भारतीय लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे. येथील संगम गावात दहशतवादी दडला असून त्याने भारतीय सैनिकांवर गोळीबार केला होता.

दरम्यान, काश्मीरमध्ये घातपात घडविण्यासाठी पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा “आयएसआय”ने जैश-ए-मोहम्मदला हाताशी घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच समोर आल्या होत्या. या दहशतवाद्यांची घुसखोरी घडविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने संघर्षबंदीचे उल्लंघन केले जात असल्याचा दावा केला जातो. पण भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर मिळत आहे. त्याचबरोबर काश्मीरमधील दहशतवादी व त्यांच्या हितचिंतकांवरही जोरदार कारवाई सुरू आहे.

leave a reply