दहशतवादी कारस्थाने आखणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा

नवी दिल्ली – पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेचा घातपात माजविण्याचा भयंकर कट उधळल्यानंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जळजळीत शब्दात याचा निषेध नोंदविला आहे. पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून भारताने कडक शब्दात पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना सहाय्य पुरविण्याचे उद्योग सोडून दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची कारवाई करावी, अशी ठाम मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. त्याचवेळी आपल्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याचा वज्रनिर्धार भारताने केलेला आहे, याचीही पाकिस्तानला यावेळी जाणीव करून देण्यात आली.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास नागरोटा येथे झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’चे चार दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांकडे 11 ‘एके-47 रायफली’, 29 ग्रेनेडस्‌, तीन पिस्तुले असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. या दहशतवाद्यांकडे डिजिटल मोबाईल रेडिओ (डीएमआर) तसेच त्यावर पाकिस्तानातून आलेले संदेश देखील सापडले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या नरोवाल जिल्ह्यातील शक्करगड इथून, हे संदेश आले होते. संदेश पाठविणारे या दहशतवाद्यांचे हँडलर होते व त्यांनी दहशतवाद्यांना ‘कहाँ तक पहुँचे? क्या सुरत-ए-हाल है?’ अशी विचारणा केलीहोती.

‘जैश’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा भाऊ मुफ्ती रौफ असगर हा या दहशतवाद्यांना सूचना देत होता, अशी माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांकडे सापडलेले डीएमआर पाकिस्तानच्या ‘मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड क्यूमोबाईल स्मार्ट फोन’ या कंपनीने तयार केलेले आहेत. तसेच दहशतवाद्यांकडे सापडलेली औषधे कराचीमधील कंपनीत तयार झालेली आहेत. यामुळे सदर दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे न नाकारता येण्याजोगे पुरावे भारताच्या हाती आल्याचे दिसते. म्हणूनच भारताच्या पंतप्रधानांनी सुरक्षा दलांनी नागरोटा येथे केलेल्या कारवाईची प्रशंसा करीत असताना, या दहशतवादाच्या कटासाठी थेट पाकिस्तानचा नामोल्लेख केला होता. भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानचा थेटपणे केलेला उल्लेख म्हणजे पाकिस्तानला भारताकडून देण्यात आलेला फार मोठा इशारा असल्याचे या देशाच्या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. शनिवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांना समन्स धाडून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या पाकिस्तानचा कडक शब्दात निषेध केला. पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहाय्य पुरविण्याचे उद्योग सोडून द्यावे आणि आपल्या देशातील दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

दरम्यान, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा स्मरणदिन जवळ येत असताना, भारतीय नौदलाने सागरी दहशतवादाचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी पूर्ण सज्जता असल्याची ग्वाही दिली आहे. उपनौदलप्रमुख एम. एस. पवार यांनी सागरी क्षेत्रातून उद्भवाणारा दहशतवाद व इतर सुरक्षाविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी नौदल आपल्याशी निगडीत असलेल्या इतर घटकांबरोबर पूर्णपणे सज्ज असल्याचे व्हॉईस ॲडमिरल पवार यांनी स्पष्ट केले. 26/11 भ्याड हल्ला चढविणारे दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतरच्या काळातही पाकिस्तानातील दहशतवादी संघटना सागरी मार्गाने भारतात घुसखोरी करून घातपात माजविण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर, नौदलाने दिलेली ही ग्वाही लक्षवेधी ठरते.

leave a reply