तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानात अंमली पदार्थांच्या व्यापारात वाढ होण्याचे संकेत

काबुल- अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर अंमली पदार्थांच्या व्यापारात अधिकच वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात तालिबानने अफगाणिस्तान सरकारविरोधात आक्रमक मोहीम छेडल्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी महत्त्वाची ठरणारी शहरे व प्रांत ताब्यात घेतले होते, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानातील अफुच्या शेतीखालील क्षेत्रात 37 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यातील बहुतांश वाढ तालिबानच्या ताब्यातील भागांमध्ये होती, असा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिला होता.

तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानात अंमली पदार्थांच्या व्यापारात वाढ होण्याचे संकेतअफुची शेती व अंमली पदार्थांचा व्यापार हे तालिबानला अर्थसहाय्य करणारे प्रमुख घटक असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय अहवालांमधून समोर आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानविरोधात राबविलेल्या आक्रमक मोहिमेत अफगाणिस्तानमधील अफुची शेती असणाऱ्या भागांवर तसेच कारखान्यांवर हल्ले चढविले होते. मात्र त्यानंतर पुन्हा तालिबानने अंमली पदार्थांच्या व्यापारावर वर्चस्व मिळविले असून त्याला पाकिस्तानी यंत्रणांचीही साथ असल्याचे मानले जाते.

तालिबानने अफगाण सरकारविरोधात आक्रमक मोहीम राबविताना, अफगाण-इराण सीमेवरील झारंज हे शहर ताब्यात घेतले होते. हे शहर अफगाणिस्तानच्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्याव्यतिरिक्त पाकिस्तान सीमेवरील स्पिन बाल्दक, इराणच्याच सीमेवरील इस्लाम काला व ताजिकिस्तानच्या सीमेजवळील मार्गावर नियंत्रण असणारे कुंडुझ ही शहरेदेखील अंमली पदार्थांच्या तस्करीत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येते. राजधानी काबुलवर ताबा मिळविण्यापूर्वी तालिबानने ही सर्व शहरे ताब्यात घेतली होती, याकडे विश्‍लेषक जोनाथन गुडहँड यांनी लक्ष वेधले आहे.तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानात अंमली पदार्थांच्या व्यापारात वाढ होण्याचे संकेत

केवळ तालिबानच नाही तर तालिबानविरोधात संघर्ष करणारे अफगाणिस्तानमधील स्थानिक सशस्त्र गटही अंमली पदार्थांची तस्करी व त्यातून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून असल्याचे गुडहँड यांनी म्हंटले आहे. दुष्काळ व अस्थिरतेच्या काळात अफुची शेती अफगाणी नागरिकांसाठीही उपजीविकेचे महत्त्वाचे साध बनल्याचे ब्रिटीश विश्‍लेषकांनी म्हटले आहे. तालिबानने त्याला अधिक प्रोत्साहन देऊन आपला फायदा करुन घेतला असून, त्यांच्या राजवटीत अंमली पदार्थांचा व्यापार ही अफगाणिस्तान व शेजारी देशांसमोरील समस्या बनू शकते, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे.

leave a reply