हिंदी महासागर क्षेत्रात भारत-रशियाच्या नौदलाचा सराव

नवी दिल्ली – हिंदी महासागर क्षेत्रात चिनी नौदलाच्या हालचाली वाढलेल्या असताना भारत आणि रशियाच्या नौदलाचा सराव सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यातही भारत आणि रशियन नौदलाचा ’इंद्रा’ सराव पार पडला होता. त्यानंतर दोन महिन्याच्या कालावधीत भारत आणि रशियामध्ये ़़होत असलेला दुसरा सागरी सराव लक्षवेधी ठरत आहे.

नौदलाचा सराव

शुक्रवारी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून हिंदी महासागर क्षेत्रात भारत आणि रशियाचा दोन दिवसांचा सागरी सराव सुरु झाला. या सरावात भारतीय नौदलाकडून ‘आयएनएस शिवालिक’, आणि ‘आयएनएस कदमत्त’ या दोन्ही युद्धनौका आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स सहभागी झाले आहेत. तर रशियाकडून ‘वारयाग’ आणि पाणबुडीभेदी ‘डमिरल पँटलेव्ह’ ही युद्धनौका सहभागी झाली आहे.

दोन दिवसांच्या सरावात पाणबुडीभेदी युद्धसरावावर आणि शस्त्रास्त्र आभ्यासावर भर दिला जाईल. भारत आणि रशियाच्या नौदलामधील सहकार्य दृढ व्हावे, या हेतूने हा सराव आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, हिंदी महासागर क्षेत्रात चीनने आगळीक केलीच तर त्याला उत्तर देण्याची पूर्ण तयारी भारतीय नौदलाने केल्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल करमबिर सिंग यांनी नुकतेच म्हटले होते.

गलवान व्हॅलीतील चीनच्या विश्‍वासाघातानंतर भारताचे रशियातील राजदूत बी. व्यकंटेश वर्मा यांनी रशियाला ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये व्यापक भूमिक स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये भारत आणि रशियाचे समान हितसंबंध आहेत. तसेच हे क्षेत्र शांतता, स्थिरता आणि आर्थिक समृद्धीचे क्षेत्र बनायला हवे अशी अपेक्षा वर्मा यांनी व्यक्त केली होती. यापार्श्‍वभूमीवर रशियाबरोबरील हा नौदल सराव महत्त्वाचा ठरत आहे.

leave a reply